कार्तिकी महाडिकचा जगात डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Mahadik

कार्तिकी महाडिकचा जगात डंका

मुंबई - आंतरराष्ट्रीय स्तरावर युरोपातील स्कॉटलंड या देशात एडिनबर्ग या ठिकाणी १९४७ पासून सांस्कृतिक महोत्सव भरविला जातो. ज्यामध्ये देशविदेशातील विविध प्रकारच्या कलांचे प्रदर्शन उत्तमोत्तम कलाकारांकडून सादर केले जाते. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे गेली ३-४ वर्ष हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित होऊ शकला नव्हता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक महोत्सव स्कॉटलंड या देशात भरविला जातो. हा कला महोत्सव तब्बल २५ दिवस सुरू असतो. या वर्षी हा महोत्सव ५ ऑगस्ट २०२२ ला सुरू होऊन २९ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरू राहील. यासाठी कार्तिकी संतोष महाडिक हिची महाराष्ट्रातून एकमेव निवड झाली आहे.

कार्तिकीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी आहे. कार्तिकीचे बाबा सैन्याधिकारी होते, तर आई सैन्याधिकारी आहे. सातारा जिल्ह्यातील आरे या गावचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक हे ४१ राजस्थान रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांना देशाच्या शत्रूशी लढताना ता. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी वीरमरण प्राप्त झाले. त्यावेळी कार्तिकी अवघी दहा वर्षांची होती. या कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले. मात्र, शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती संतोष महाडिक देखील कणखर बाण्याच्या. सैन्याधिकारी पती शहीद झाल्यानंतर रडत न बसता त्यांनी अख्ख्या जगासमोर महाराष्ट्राच्या इतिहासातील राजमाता जिजाऊंच्या लढाऊ बाण्याचा आदर्श ठेवला.

एका शहीद सैन्याधिकाऱ्याची पत्नी पहिल्यांदा एक सैन्याधिकारी बनण्याचा इतिहास घडला. तोदेखील स्वकर्तृत्वावर, सैन्याधिकारी बनण्यासाठीच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि त्यानंतरचे सर्व खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून सैन्यात सेवा बजावत आहेत. असा आदर्शवत लढाऊ बाणा रक्तातच असलेल्या लढाऊ आईबाबांची लाडकी लेक कार्तिकी वेगळी कशी बरे असू शकेल. सैन्याधिकारी आईवडिलांचे देशप्रेमाचे संस्कार लाभलेली कार्तिकी शालेय जीवनापासूनच अष्टपैलू.

इयत्ता ६ वीमध्ये असल्यापासूनच तिने ‘भरतनाट्यम’ हा राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेला नृत्यप्रकार आत्मसात करण्यास सुरुवात केली. जसे जसे दिवस पुढे पुढे जाऊ लागले तसे तसे कार्तिकी कठोर मेहनत घेत भरतनाट्यममध्ये पारंगत होऊ लागली आणि आता कार्तिकी तिच्या आईबाबांसारखीच आपल्या भारतमातेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झालीय. तेही अशा या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत मानाच्या सांस्कृतिक महोत्सवात आपल्या कार्तिकीची भरतनाट्यम नृत्यकलेतील ‘अरंगेत्रंम्’ हा विशेष प्रकार सादर करण्यासाठी निवड झाली आहे. तिच्यासोबत तिच्या सहकारी निकिता आणि अन्यना यादेखील असणार आहेत. चेन्नई येथील ‘कलाक्षेत्र फाइन आर्ट्स’ या संस्थेच्या गुरू श्रीमती सी. के. राजलक्ष्मी आणि पंडित राजेंद्र गंगणी यांचे मोलाचे मार्गदर्शन या सर्वांना मिळाले आहे.

Web Title: Karthiki Mahadik Selected For Bharatanatyam At The International Edinburgh Cultural Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..