
Raju Shetti : केसीआर यांचा मास्टर प्लान, राजू शेट्टींना दिली ही ऑफर
Mumbai News - शेतकऱ्यांच्या राज्यासाठी देश पिंजून टाकण्याचे रणशिंग रविवारी नांदेडात येवून फंुकणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना महाराष्ट्राच्या प्रमुखपदी राजू शेट्टी यांना विराजमान करायचे आहे.
कर्नाटक तमिळनाडू आंध्र आणि महाराष्ट्र या राज्यात विस्तार करीत पंतप्रधानपदाची मनीषा बाळगणार्या केसीआर यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद राजू शेट्टी यांनी स्वीकारावे अशी विनंतीवजा प्रस्ताव त्यांनी शेट्टींना पाठवला आहे असे विश्वसनीयरित्या समजते.शेतकर्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण अशी साद घालत त्यांनी शेट्टींसह राज्यातील महत्वाच्या शेतकरी नेत्यांशी संपर्क केला आहे."
अबकी बार ,शेतकरी सरकार " ही घोषणा देत राज्याराज्यात के चंद्रशेखर राव प्रवेशणार आहेत.काल ता ५ रोजी नांदेडात सभा घेतानाच महाराष्ट्राच्या आखणीचे चित्र त्यांनी तयार केले आहे.
शेतकर्याला कोणतीही अट न घालता प्रती एकरी दरवर्षी दहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा ,शेतकरी २० ते ६० या वयोमर्यादेत असताना मृत्यू पावला तर ५ लाखापर्यंतचा आयुर्विमा ,शेतीसाठी मोफत वीजपाणी अशा अनेक चित्ताकर्षक योजना त्यांनी घोषित केल्या आहेत.तेलंगणात ते या योजना राबवतही आहेत.
प्रत्येक राज्यात रयतेच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्यासाठी स्थानिक नेतृत्वाची गर असते.त्यासाठीच त्यांनी राजू शेटटी यांना मनवण्याची सुरुवात केली आहे.केसीआर यांचा एक दूत नुकताच शेट्टी यांना भेटून गेला.बीआरएसमधील एका महत्वाच्या पदाधिकार्याने या माहितीला दुजोरा दिला.शेट्टी यांची आम्हाला प्रतीक्षा आहे ,
त्यांच्या होकाराची वाट पहातो आहोत असे हा पदाधिकारी म्हणाला .राजू शेट्टी यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होवू शकला नाही.शेतकरीजनतेचे राज्यातले प्राबल्य लक्षात घेता महाराष्ट्र बीआरएसला महत्वाचे वाटते आहे.
महाराष्ट्रातील काही शेतकरी नेत्यांना केसीआर यांनी राज्याचे काम बघण्याची गळ घातली आहे. शेट्टी पक्षाचे प्रमुख होण्यास तयार झाले तर लोकमान्य चेहरा मिळेल असे केसीआर यांना वाटते. अबकी बार ,शेतकरी सरकार या काल नांदेडात दिलेल्या घोषणेपूर्वी त्यांनी काही गृहपाठ पूर्ण केला होता असे समजते.
तेलगूभाषकांची लोकसंख्या लक्षात घेता त्यांनी नांदेड जिल्ह्यात प्रचाराला प्रारंभ केला .आता पाठोपाठ लगतच्याच लातूर आणि विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात तेलगू लोकसंख्या अधिक असल्याने तेथेही ते प्रचारास जाणार आहेत.
बिलोली ,उमरगा या विधानसभा मतदारसंघात ,खुद्द नांदेड आणि चंद्रपूर या शहरात तसेच मुंबईच्या काही विधानसभा क्षेत्रात असलेले तेलगू लक्षात घेता या भागांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
गेले चार महिने या भागाची रेकी त्यांच्या राज्यातून आलेली मंडळी करत आहेत.सध्या तरी राज्यभर चालेल असा चेहरा त्यांना मिळालेला नाही.
मात्र शेतकरी जनतेला आपलेसे वाटणारे कार्यक्रम त्यांनी तेलंगणात यशस्वीपणे राबवले आहेत. सध्या ७ ते ८ मराठी नेते त्यांच्या समवेत आहेत.एखाद दोन माजी आमदार वगळता त्यात कुणी फारसे दखल घेण्यासारखे दिसलेले नाही.
कॉंग्रेसच्या एका आमदाराचा भाऊ केसीआरना मदत करतो आहे असे समजते.भाजपच्या विरोधात एकत्रित आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरु असताना नांदेडसारख्या कॉंग्रेसची शक्ती असलेल्या जिल्ह्यात येवून केसीआर यांनी काय साधले असे विचारले जाते आहे.आपलीच शक्तीकेंद्रे खिळखिळी करण्याच्या या प्रकारावर कॉंग्रेस नाराज आहे असे समजते.
कर्नाटकातील निवडणुकीत उतरण्यापूर्वी महाराष्ट्रात पक्षकार्याला प्रारंभ करणे हा केसीआरच्या सभेमागचा उद्देश होता. काही महिन्यांपूर्वी केसीआर यांनी त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती.
ऐक्याच्या आणाभाका घेतल्यानंतर आता हा प्रवेश कशाला ? राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काही निर्धारीत संख्येच्या राज्यात मते मिळवावी लागतात त्यामुळे ते राज्यात आले आहेत असे बोलले जाते आहे.