शिवसेना नगरसेविकांमध्ये शाब्दिक चकमक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

कल्याण  - कल्याण-डोंबिवली महापालिका महापौर निवडणुकीदरम्यान सभागृहात सत्ताधारी शिवसेना नगरसेविकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. महापौर पदासाठी आगरी समाजातील उमेदवाराला संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या गटाच्या माजी महापौर वैजयंती घोलप गुजर यांच्याशी चकमक झाली. नवनिर्वाचित महापौर विनिता राणे यांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून आपण त्यावर योग्य ती कारवाई करू, अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

विनिता राणे यांची निवड आज जरी बिनविरोध झाली असली, तरी पक्षातील जातीचे राजकारण त्यांना त्रासदायक ठरण्याची शक्‍यता आहे. पालिका सभागृहात आगरी समाजाचे प्रतिनिधित्व जवळपास 70 टक्के आहे. आज निवडणुकीदरम्यान आगरी आणि आगरीतर समाजावरून सभागृहात चकमक उडाली. या समाजातील महिलेला संधी दिली नाही, याची नाराजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंतही पोहोचलेली आहे. राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या नाराजांच्या गटाने पालकमंत्र्यांची भेट घेतली होती; मात्र त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठवण्यात आले होते. आज निवडणुकीआधी शिवसेनेच्या नगरसेवक; तसेच नगरसेविकांसाठी फेटे बांधण्याची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु एक-दोन अपवाद वगळता कोणीही फेटे बांधून घेतले नाहीत. काही नाराज महिला नगरसेविकांनी निषेध म्हणून काळ्या रंगाचे कपडे घातले होते. याच विषयावरून सभागृहात माजी महापौर वैजयंती घोलप गुजर यांची मनीषा तरे, शालिनी वायले, प्रेमा म्हात्रे आणि अन्य काही नगरसेवकांबरोबर शाब्दिक चकमक झाली. शिवसेनेत जातीपातीचे राजकारण नसते, त्याची चर्चा नको, असे वैजयंती गुजर घोलप यांनी ठणकावले. यावरूनच वाद वाढला. निवडणूक अधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतरही हा वाद काही काळ सुरूच राहिला. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे महापौर निवडणुकीसाठी उपस्थित होते; मात्र या दोघांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले. 

महापौर निवडणुकीशी जातीपातीच्या राजकारणाचा संबंध नाही. पक्षात असे कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. महापौरपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे, त्यानुसार हे पद त्या आरक्षणातून निवडून आलेल्या महिलेला देण्यात आले. 

- एकनाथ शिंदे, पालकमंत्री 

Web Title: KDMC mayor election