'खाकी'ने दाखवली भूतदया; पोलिसानी दिले अशक्त पक्ष्याला जीवदान

दीपक शेलार
Sunday, 6 September 2020

प्राणिमित्र पोलिस ज्ञानेश्वर शिरसाठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अचेतन पडलेल्या काळा अवाक (लाल डोक्याची शेराटी) या दुर्मिळ पक्षाला जीवदान देऊन 'खाकी'तील भूतदयेचा प्रत्यय दाखवून दिला.

ठाणे ः पोलिस म्हटला की, सदैव कायदा व सुव्यवस्थेचे जोखड वाहणारा श्रमिक. कोरोना काळातील बंदोबस्तात तर पोलिसांच्या कर्तव्याचे तर अनेकांनी गुणगान केले. एरव्ही 'खाकी' वर्दीला समाजात नेहमीच दुषणे दिली जातात, परंतु ठाणे शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले प्राणिमित्र पोलिस ज्ञानेश्वर शिरसाठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अचेतन पडलेल्या काळा अवाक (लाल डोक्याची शेराटी) या दुर्मिळ पक्षाला जीवदान देऊन 'खाकी'तील भूतदयेचा प्रत्यय दाखवून दिला. तीन दिवस संगोपन आणि औषधोपचार करून या पक्ष्याला कोपरी विसर्जन घाटावरील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

रिया चक्रवर्ती म्हणतेय मी अटकेसाठी तयार; रिया निरपराध आहे, वकिलांचे पुनरुच्चार 

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर काळा अवाक हा पक्षी पोलिस कॉन्स्टेबल हेमंत सोनवणे यांना दिसला. पावसात भिजल्यामुळे अशक्तपणा येऊन हा पक्षी अचेतन पडून होता. त्याला उडण्याचेही त्राण नव्हते. सोनवणे यांनी लागलीच वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या प्राणिमित्र शिरसाठ यांना जखमी पक्ष्याबद्दल कळवले. त्यानुसार शिरसाठ यांनी त्या पक्ष्याला पशुवैद्यक डॉ. हेमंत थांगे यांच्या सल्यानुसार योग्य काळजी घेत तीन दिवस खाणेपिणे व औषधोपचार केला. ठणठणीत बरा झाल्यानंतर  2 सप्टेंबर रोजी कोपरी येथील गणपती विसर्जन घाट या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले. 
 

दक्षिण आशियात आढळणाऱ्या प्रजातीमधीत काळा अवाक (लाल डोक्याची शेराटी) या पक्ष्याची चोच अणकुचीदार असते. हा पक्षी दुर्मिळ असून शहरातील उंच मोबाईल टॉवरवर घरटे बांधून राहतो. मार्च ते ऑक्टोबर हा या पक्ष्यांचा विणीचा काळ असून कदाचित भक्ष्याच्या शोधात पाण्यात पडल्याने जखमी झाला असावा. शरीरातील क्षारांचे प्रमाण घटल्याने त्याला ग्लुकोज पाजून सचेत केले.
- ज्ञानेश्वर शिरसाठ,
वाहतूक पोलिस, ठाणे

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khaki shows ghostly kindness; Police gave life to a weak bird