सोमय्यांमुळे भाजपच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली, आवर घालण्याची मागणी

Kirit-Somaiya
Kirit-SomaiyaSakal

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढायला सुरुवात केली. त्यांनी सतत मविआ सरकारच्या मंत्र्यांना रडारवर ठेऊन त्यांच्या कुटुंबीयांची प्रकरणंही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

यानंतर मुंबई मनपा निवडणुकीच्या आधीच राजकीय चिखलफेकीला सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र, सोमय्यांच्या या आरोपांमुळे मुंबईत भाजपाला फटका बसू शकतो, अशी चर्चा भाजपच्या अंतर्गत गोटात आहे.

भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे बाहेर काढत ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यामुळे आता मुंबईतील भाजपच्या मराठी नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीला काही महिने उरलेले असतानाच किरीट सोमय्या ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, त्याचा उलटा परिणाम होणार असल्याची शंका भाजप नेत्यांच्या मनात आहे.

सेनेला टार्गेट केल्याने भाजपचा मराठी मतांचा टक्का घसरण्याची शक्यता पक्षांतील नेत्यांनीच वर्तवली आहे. त्यामुळे सोमय्यांना थोडासा आवर घालण्याची गरज असल्याचे भाजप नेते खासगीत बोलत आहेत.

आधीच मुंबई भाजपमध्ये दोन गट, त्यात किरीट सोमय्या!

मुंबई भाजपमध्ये आधीपासूनच दोन गट पाहायला मिळत आहेत. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मुंबई भाजपचे अध्यक्षपद गेल्यानंतर भाजपाचे मुंबईतील काही मराठी नेते आपसुकच लांब गेले आहेत. त्यात मागील काही महिन्यात किरीट सोमय्या, मनोज कोटक आणि इतर भाजपमधील गुजराती नेत्यांचे पक्षात वाढलेलं वजन यामुळे मराठी नेते देखील नाराज आहेत.

त्यातच किरीट सोमय्या हे सातत्याने शिवसेनेला टार्गेट करत असल्याने मराठी मते तर आपल्या हातून  जाणार नाहीत ना, याची भीती भाजपच्या मुंबईतील मराठी नेत्यांना वाटू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com