40 ते 60 वयोगटात गुडघेदुखीच्या तक्रारींमध्ये 70 टक्क्यांनी वाढ

भाग्यश्री भुवड
Saturday, 5 December 2020

अनलॉकनंतर गुडघेदुखीच्या तक्रारींमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाल्याचे डॉक्टरांच्या निष्कर्षातून समोर आले. मध्यम वयोगटातील म्हणजेच 40 ते 60 या वयोगटातील लोकांच्या गुडघेदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली.

मुंबई: अनलॉकनंतर गुडघेदुखीच्या तक्रारींमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाल्याचे डॉक्टरांच्या निष्कर्षातून समोर आले आहे. मध्यम वयोगटातील म्हणजेच 40 ते 60 या वयोगटातील लोकांच्या गुडघेदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ड जीवसत्वाची कमतरता ही मुलभूत कारणे या गोष्टीसाठी कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

लॉकडाऊन काळात बरेच महिने घरी राहिल्यानंतर अचानक पुन्हा व्यायामाला सुरुवात करणे, शारिरीक हालचालींना आलेला वेग तसेच चुकीच्या पध्दतीने केले जाणारे व्यायाम प्रकार या साऱ्यांचा ताण गुडघ्यांवर येत आहे. शिवाय, सध्या चालू असलेला हिवाळ्याचा हंगाम आणि थंड तापमानामुळे ही गुडघेदुखीचे प्रमाण वाढले आहे. घरात राहिल्याने पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाली आहे. तसेच बैठी जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे बऱ्याच लोकांचे वजन वाढले आहे. चुकीच्या पध्दतीने व्यायाम केल्याने गुडघ्यावर अतिरिक्त भार येत असल्याने वेदना होत आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या 10  पैकी 8 रुग्णांना गुडघेदुखीची समस्या दिसून येत असल्याची माहिती अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे जॉइंट रिप्लेसमेंट अँड आर्थ्रोस्कोपी स्पेशॅलिस्ट डॉ. आनंद जाधव यांनी दिली आहे.

गुडघेदुखीच्या समस्येतून वाचण्यासाठी काय कराल ?

गुडघेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली नक्कीच फायदेशीर ठरेल. आवश्यकतेनुसार वेदनाशामक औषध घेणे, दररोज व्यायाम करणे, चालणे, वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. संतुलित आहार देखील महत्त्वाचा आहे. दीर्घकाळ उभे राहणे किंवा बसणे टाळणे टाळा. ट्रेकींग आणि चढ किंवा उतार करणे टाळा. मात्र लोक सपाट पृष्ठभागावर ट्रेक करू शकतात. व्यायामाची सायकल वापरू शकतात. फिजिओथेरपिस्ट किंवा योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली व्यायाम करा. खाण्याच्या चांगल्या सवयींमध्ये हिरव्या पालेभाज्या, दूध, फळे, बीट, सोयाबीन आणि मासे यांचा समावेश असावा.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Knee Pain complaints 70 percent increase between 40 to 60 age


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knee Pain complaints 70 percent increase between 40 to 60 age