अजिबात घाबरू नका, जाणून घ्या 'बर्ड फ्ल्यू' बद्दल सर्व काही | Know All About Bird Flu

अजिबात घाबरू नका, जाणून घ्या 'बर्ड फ्ल्यू' बद्दल सर्व काही | Know All About Bird Flu

मुंबई : 'बर्ड फ्ल्यू'ची लागण माणसांना होते का ? जगभरात बर्ड फ्लूचा रुग्ण आढळला आहे का ?  सध्या हा आजार केवळ पक्ष्यांपुरता मर्यादित आहे का? आपण चिकन खाऊ शकतो का? 'बर्ड फ्ल्यू'च्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यायला हवी याविषयी राज्य सर्वेक्षण अधिकारी / एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्र डॉ. प्रदीप आवटे यांची प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी घेतलेली मुलाखत.

प्रश्न - बर्ड फ्ल्यू म्हणजे काय ? 

- हा इन्फ्लुएंझा विषाणूचा एक प्रकार आहे. या मध्ये एच 5 एन 1 या विषाणू मुख्यत्वे आढळतो. याशिवाय इतर विषाणू प्रकार जसे एच 5 एन 8 आणि इतर प्रकारही आढळतात. इन्फ्ल्युएंझा विषाणूचे नैसर्गिक घर म्हणजे पाणपक्षी. बदक आणि त्यासारखे पाणपक्ष्यांच्या शरीरात हा विषाणू राहतो. 1878 मध्ये बर्ड फ्लू हा आजार प्रथमतः शेतावर पाळल्या जाणाऱ्या काही पक्षांमध्ये आढळला. जंगली पक्षांमध्ये देखील बर्ड फ्लू आढळतो तथापि त्यामुळे ते आजारी पडताना दिसत नाहीत मात्र पाळीव पक्षांमध्ये हा विषाणू वेगाने पसरताना दिसतो आणि कोंबड्या, बदके किंवा इतर पाळीव पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यु घडून येतात.

प्रश्न – बर्ड फ्ल्यू माणसाला होऊ शकतो का ? 

- भारतात आजवर एकही बर्ड फ्लूचा रुग्ण माणसांमध्ये आढळलेला नाही. हा विषाणू माणसांमध्ये वेगाने पसरताना दिसत नाही. सध्या हा आजार केवळ पक्ष्यांमध्ये आहे. 1997 मध्ये हॉंगकॉंगमध्ये माणसांमध्ये ही बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळले. आतापर्यंत जगभरात बर्ड फ्लूची लागण झालेल्या माणसांची संख्या सातशेच्या आसपास आहे. ज्या व्यक्ती पक्ष्यांच्या निकट संपर्कात असतात त्यांच्यामध्ये ही लागण मुख्यत्वे झालेली दिसून येते. माणसांमध्ये हा विषाणू सहजतेने पसरत नाही. त्यामुळे एका माणसापासून माणसास प्रसार होताना दिसत नाही. कत्तलखान्यात काम करणाऱ्या किंवा बाधित पक्ष्याच्या कच्च्या मांसाला उघडया हातांनी आणि निष्काळजीपणे हाताळणा-या व्यक्तींना हा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता असते. 

प्रश्न -  बर्ड फ्ल्यू कसा पसरतो ? 

- संसर्ग झालेल्या पक्ष्यांच्या लाळेतून किंवा नाकातील स्त्रावातून आणि विष्ठेतून हे विषाणू बाहेर पडतात. या स्त्रावाचा किंवा विष्ठेचा संपर्क आल्याने इतर पक्ष्यांमध्ये ही हा आजार पसरत जातो.

प्रश्न – चिकन किंवा अंडी खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू पसरु शकतो का ? बर्ड फ्ल्यू पासून बचावासाठी आपण काळजी घ्यावी ? 

- नीट आणि पुरेशा शिजवलेल्या चिकन किंवा अंडयावाटे हा विषाणू पसरत नाही. अन्न शिजवताना तापमान ७० डिग्री सेल्सियस पर्यंत जाते त्यामध्ये हा विषाणू तग धरु शकत नाही.  सध्या हा आजार केवळ पक्ष्यांमध्ये आहे. भारतात आजवर एकही बर्ड फ्लूचा रुग्ण माणसांमध्ये आढळलेला नाही. हा विषाणू माणसांमध्ये वेगाने पसरताना दिसत नाही. त्यामुळे बर्ड फ्लूच्या अनुषंगाने आपण घाबरून जाण्याची गरज नसली तरी याबाबत आपण काय काळजी घ्यावी हे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी पुढील खबरदारी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे.

  • पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठे सोबत संपर्क टाळा.
  • पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा.
  • शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.
  • एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नका.जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा.
  • कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा.  व्यक्तिगत स्वच्छता राखा.परिसर स्वच्छ ठेवा.
  • कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा.
  • पूर्ण शिजवलेले मांसच खा.
  • आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागात कळविणे आवश्यक आहे.

प्रश्न -  या शिवाय आणखी काय काळजी आपण घ्यायला हवी ? विशेषतः स्थलांतरित पक्ष्यांबाबत काय सांगाल ? 

- बर्ड फ्ल्यू प्रतिबंधासाठी आपण पुढे नमूद केलेल्या बाबींबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.  

  • कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.
  • अर्धवट शिजलेले मांस/चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.
  • आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका.
  • पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका.

आपल्या भागात कुठेही एखादा पक्षी अथवा कोंबड्या मरून पडताना दिसल्या तर त्यांची विल्हेवाट कशी लावावी, यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाशी समन्वय साधून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे अनेक ठिकाणी स्थलांतरित पक्षी येतात. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील उजनी जलाशय किंवा विदर्भातील नवे बांध आणि पेंच जलाशय ही याची काही उदाहरणे या पक्ष्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जमा होतात. बर्ड फ्ल्यूचा धोका लक्षात घेता या पद्धतीचे पर्यटन देखील आपण टाळणे योग्य राहील.

प्रश्न – सध्या राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पक्ष्यांमध्ये बर्ड फ्ल्यू आढळला आहे ? तिथे आपण काय उपाय योजना करत आहोत ? 

- सध्या मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पक्ष्यांमध्ये बर्ड फ्ल्यू आढळला आहे. या भागात आपण सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभाग एकमेकांच्या सहकार्याने पुढील कार्यवाही करत आहोत –

  • 1. संसर्ग क्षेत्रात कोंबडया सामूहिक स्वरुपात नष्ट करणे. 
  • 2. बाधित क्षेत्रातील पोल्ट्री फर्ममध्ये राहणारी कुटुंबे आणि कोंबडया सामूहिकपणे नष्ट करण्यासाठी जे मनुष्यबळ वापरले जाते त्यांना ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन करणे तसेच त्यांना प्रतिबंधात्मक स्वरुपात टॅमिफ्ल्यू हे औषध देणे. 
  • 3.बाधित भागात 10 किमी त्रिज्येच्या भागात सर्वेक्षण करुन फ्ल्यू सारखी लक्षणे असणा-या व्यक्तींचा शोध घेणे आणि त्यांचे नाक/घसास्त्राव नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविणे. 
  • 4. या भागातील डॉक्टरांचे आणि आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेणे. 
  • 5. लोकांना विविध माध्यमातून आरोग्य शिक्षण देऊन बर्ड फ्ल्यू संदर्भात काय काळजी घ्यावी याबाबत अवगत करणे. 

know all about bird flu exclusive interview of State Survey Officer Dr pradip awate

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com