कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ठप्‍प

देवेंद्र दरेकर : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

पोलादपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात सहा महिन्यांपासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत.

पोलादपूर : पोलादपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात सहा महिन्यांपासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. याउलट शस्त्रक्रियेसाठी महाड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करून घेण्याचे सांगण्यात येत असल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त  होत आहे.

केंद्र व राज्य सरकारने देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी हम दो! हमारे दो! असा नारा देत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रम मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली होती. यामुळे देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेल्या या यशस्वी मोहिमेचे लोकचळवळीत रूपांतर झाले. आजच्या घडीला एक किंवा दुसऱ्या अपत्यानंतर महिला व तिचे कुटुंब, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी स्वतःहून पुढे येत आहेत. मात्र, पोलादपुरात याचे चित्र उलट आहे. 

पोलादपूर शहरापासून एक किलोमीटरवर मुंबई-गोवा महामार्गालगत शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. शहरासाठी हे एकमेव ग्रामीण रुग्णालय असून तालुक्‍यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. प्रामुख्याने या रुग्णालयात प्रसृतीसाठी तालुक्‍यातील दुर्गम, अतिदुर्गम डोंगराळ भागातील गाव, वाड्या आणि वस्त्यांमधील गरोदर महिला येतात; मात्र येथे प्रसृती झाल्यानंतर त्या महिलेला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल, तर तिला महाड शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठवले जाते. सहा महिन्यांपासून येथे एकही शस्त्रक्रिया करण्यात येत नाहीत.

असुविधांचा बाजार
बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिला या दुर्गम, अतिदुर्गम गावांतील १० किलोमीटरपासून २७ किलोमीटरवरील असतात. त्या रुग्णालयात दाखल झाल्यावर तिच्या सोबतीला एक महिला राहते; तसेच तिच्या व बाळाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी, बाळ-बाळंतिणीला पाहण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक रुग्णालयात येत असतात. रुग्णालयात रुग्णाला जेवण देण्याची सुविधा नाही. परिणामी, रुग्णासाठी दवाखान्यात तीन-चार दिवस असेपर्यंत घरून जेवणाचा डबा आणावा लागतो किंवा आजूबाजूच्या खानावळ किंवा हॉटेलमधून विकत घ्यावा लागतो. एवढे सर्व काही करूनही प्रसृतीनंतर महिलेला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी २० किलोमीटरवर असलेल्या महाड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले जात असेल, तर त्या महिला व तिच्या कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. शिवाय, आर्थिकदृष्ट्या नुकसानही होते. या वेळी रुग्ण महिलेच्या जेवणाची सुविधा करण्यात यावी, अशी महिलांची मागणी आहे.

वैद्यकीय पदे रिक्‍त
रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक या पदावर महिला वैद्यकीय अधिकारी असून, त्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्षही अद्ययावत व सुसज्ज असा आहे. तरीही येथे शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. याबाबत चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात आहे. रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दर दिवशी १०० ते १५० रुग्ण उपचारासाठी येत असतात. आंतररुग्ण विभागातही रुग्ण दाखल आहेत. मात्र, या दोन्ही विभागांत वैद्यकीय अधीक्षक वगळता एक आयुष डॉक्‍टर सेवारत आहे. वास्ताविक, या रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी वर्गाची तीन पदे रिक्त आहेत. तर आयुष डॉक्‍टर पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक आयुर्वेदिक डॉक्‍टरचे पद रिक्त आहे. त्यामुळे या रुग्णालयात भार वैद्यकीय अधीक्षक आणि आयुष डॉक्‍टर सद्यस्थितीत सांभाळत असल्याने रुग्णालयाची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे अक्षरशः गैरसोय होत आहे. परिणामी, रुग्णालयाची आरोग्य सेवा कोलमडली आहे.

यापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आणि सिझर येथे करत होते. येथे भूलतज्ज्ञ नाहीत. जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय, रायगड अलिबाग यांनी या रुग्णालयासाठी भूलतज्ज्ञाची नियुक्ती केल्यास पूर्ववत शस्त्रक्रिया केल्या जातील.
- डॉ. भाग्यरेखा पाटील, वैद्यकीय अधीक्षक, पोलादपूर ग्रामीण रुग्णालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kutumb Niyojan service stop in Poladpur Rural Hospital