रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये तू तू... मैं मैं..! सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ

शर्मिला वाळुंज
Tuesday, 20 October 2020

राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाचा केवळ खेळ चालू असून लोकांच्या होणाऱ्या गैरसोयीचे त्यांना काहीही देणेघेणे नसल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत.

 

ठाणे - लोकलमध्ये गर्दी होऊ नये, शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्हावे याचे नियोजन होत नसल्याने अद्याप सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा सुरु झालेली नाही. प्रवाशांच्यासोयी साठी बसवाहतूकीचा पर्याय सध्याच्या घडीला उपलब्ध आहे. या बसमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी पहाता येथे कोरोना होत नाही का? शारीरिक अंतराचे नियम बससाठी नाहीत का? रेल्वे प्रशासन नियमांसाठी आग्रही असताना, बसमध्ये नियमांचे उल्लंघन होताना दिसते. राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाचा केवळ खेळ चालू असून लोकांच्या होणाऱ्या गैरसोयीचे त्यांना काहीही देणेघेणे नसल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत.

कल्याण पत्रीपुलाच्या कामाला वेग, गुरुवारपर्यंत पुलावरील रात्रीची वाहतूक बंद

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू केलेली टाळेबंदी बऱ्याचअंशी शिथिल करण्यात आली आहे. त्याप्रमाणात वाहतूकीची व्यवस्था मात्र सुरु झाली नसल्याने बदलापूर, कल्याण, डोंबिवली दिशेने ठाणे, मुंबई, नवी मुंबईला नोकरीनिमित्त जाणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत. बससाठी तासनतास रांगेत उभे राहणे, रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे प्रवासादरम्यान होणारे हाल हा त्रास कमी की काय आता बसमध्ये प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे अनेकांना उभे राहून पाच ते सहा तासांचा प्रवास करावा लागत आहे. गर्दी होऊ नये, शारीरीक अंतराच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा अद्याप सुरु केली जात नाही आहे. याचे नियोजन राज्य सरकारने करावयाचे सांगत रेल्वे प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. टाळेबंदीतील शिथिलता आणि वाहतूक सेवेतील समतोल साधण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले आहेत. यावर आता राज्य सरकार काय पावले उचलते याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. 

 

टाळेबंदी उठविताना टक्केवारीतही सूट देत राज्य सरकारने सर्व गोष्टी सुरु केल्या आहेत. केवळ वाहतूक व्यवस्थेचे नियोजन सरकारला अद्याप जमलेले नाही. रस्ता वाहतूकीचा पर्याय केवळ नागरिकांसाठी खुला ठेवला आहे. परंतू कल्याण शीळ रोडची दुरावस्था, वाहतूक कोंडीने गेले पाच सहा महिने प्रवासी त्रस्त असतानाही सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही. प्रवाशांनी मागणी जोर लावून धरल्यानंतर केवळ रेल्वे प्रशासनाला पत्र व्यवहार करीत राज्य सरकारने जणू आपले काम केले. तर रेल्वेने परवानगी नाकारत नियोजनाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे सांगत जबाबदारी झटकली. यामध्ये प्रवाशांची बाजू कोणीच लक्षात घेत नाही आहेत. प्रवाशांना दररोज कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे सरकारने एकदा स्वतः बसने प्रवास करुन जाणून घ्यावे अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. 

मराठी भाषेच्या आग्रहासाठी राज ठाकरेंचा जगात डंका! अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझॉसचे प्रतिनिधी मुंबईत

बसेसमध्ये कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टसिंग पाळले जात नाही आहे. महापालिकांनीही त्यांची बसेस वाहतूक व्यवस्था सुरु केल्याने काही प्रमाणात राज्य एसटीमहामंडळाच्या बसेसमधील गर्दी विभागली जाईल असे म्हटले जात आहे. परंतू प्रवाशांची संख्या वाढल्याने गर्दी विभागली जात नाही. प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करीत राज्य सरकारने ठोस निर्णय घेत गर्दीचे विभाजन पहिले करावे असे बदलापूरचे प्रवासी श्याम वैद्य यांनी सांगितले. तर कल्याणच्या राजश्री कांबळे म्हणाल्या नवी मुंबई दिशेने मी दररोज प्रवास करते, एनएमएमटीच्या, राज्य सरकारच्या बसेस असल्या तरी सकाळ संध्याकाळ बसेसला गर्दी असते. कोणत्याही नियमांचे पालन येथे होत नाही. अनेकदा प्रवासी मास्क काढून बसतात, त्यांना कोण समजवणार. नियोजनच योग्य नसल्याने सहा सात महिने होत आले तरीही जनजीवन सुरळीत होत नाही आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lack of coordination between the railways and the state government has hit the common man