esakal | Special Report | आदिवासी गावात सुविधांची वानवा; जव्हारमधील आदिवासी जगताहेत हलाखीचे जीवन 
sakal

बोलून बातमी शोधा

Special Report | आदिवासी गावात सुविधांची वानवा; जव्हारमधील आदिवासी जगताहेत हलाखीचे जीवन 

स्वातंत्र्याची 74 वर्षे उलटूनही जव्हार तालुक्‍यातील आदिवासी गाव पाड्यांना रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या प्राथमिक सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे येथील आदिवासींना आयुष्य जगण्यासाठी झगडावे लागते आहे.

Special Report | आदिवासी गावात सुविधांची वानवा; जव्हारमधील आदिवासी जगताहेत हलाखीचे जीवन 

sakal_logo
By
भगवान खैरनार

मोखाडा  ः स्वातंत्र्याची 74 वर्षे उलटूनही जव्हार तालुक्‍यातील आदिवासी गाव पाड्यांना रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या प्राथमिक सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे येथील आदिवासींना आयुष्य जगण्यासाठी झगडावे लागते आहे. परिणामी, या भागात कुपोषण, बालविवाह, बालमृत्यू आणि माता मृत्युच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे आम्ही मुख्य प्रवाहात कधी येणार, असा सवाल येथील आदिवासींनी उपस्थित केला आहे. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड परिरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जव्हार तालुक्‍यातील पिंपळशेत-खरोंडा ग्रामपंचायतमधील हुंबरण, सुकळीचा पाडा, तिलोंडा ग्रामपंचायतीतील डोंगरीचा पाडा, उदारमाळ, हातेरीतील केळीचा पाडा, विनवळमधील निंबारपाडा, तुंबडपाडा, झापमधील दखण्याचा पाडा, उंबरपाडा, पाथर्डीतील मनमोहाडी, भाट्टीपाडा, न्याहाळेतील सावरपाडा, ऐनातील सोनगीरपाडा, घाटाळपाडा, भुरीटेक ग्रामपंचायत, आणि वावर-वांगणीतील बेहेडपाडा, या गावपाड्यांमध्ये अद्यापही रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या प्राथमिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. सरकार शहरातील नागरिकांना सुविधा कशा अधिक सुखकर होतील, यासाठी प्रयत्नशील असते; मात्र जव्हारमधील आदिवासी गावपाडे आजही प्राथमिक सुविधांपासून कोसो दूर आहेत. 

मागील महिन्यात झाप, पाथर्डी आणि पिंपळशेत-खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील गावपाड्यांमध्ये उपचाराअभावी माता व बालमृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. माध्यमांनी ही बाब समोर आणल्यानंतर या भागात खासदार राजेंद्र गावित तसेच माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. प्रजीत नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी पायपीट करत दौरे केले आहेत. त्या वेळी येथील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणार, असे खासदार राजेंद्र गावित आणि माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, जिल्हा परिषद सदस्या गुलाब राऊत यांनी वेगवेगळ्या दौऱ्यात आश्वासन दिले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या भागात पायपीट करत एवढे मोठे लोकप्रतिनिधी पोहोचल्याने येथील आदिवासींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आजपर्यंत येथे रस्ता आणि आरोग्य सुविधा नसल्याने, उपचाराअभावी शेकडो मृत्यू झाले आहेत. 

आजपर्यंत येथे निवडणुकीच्या काळात उमेदवार आणि लोकप्रतिनिधी येतात व आश्वासन देतात. येथे रस्ता नसल्याने रुग्णांना डोली करून पायपीट करत दवाखाना गाठावा लागतो. अनेकांचे रस्त्यातच मृत्यू झालेत. आमच्या ग्रामपंचायतीमधील हुंबरणचे नागरिक कधी मुख्य प्रवाहात येणार? 
- सुभाष गावित, ग्रामस्थ, पिंपळशेत 


मी आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी अतिदुर्गम गावपाड्यांचा दौरा केला आहे. येथे प्राथमिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून वारंवार जिल्हा परिषदेत पाठपुरावा केला आहे. यातील काही गावपाड्यांना खासदार राजेंद्र गावित आणि माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भेटी देत पाहणी केली आहे. त्यामुळे सरकारदरबारी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 
- गुलाब राऊत,
जिल्हा परिषद सदस्या, जव्हार 

Lack of facilities in tribal villages The tribal people of Jawahar are living a miserable life

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )