अन् रिक्षातच दिला तिने बाळाला जन्म...

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 एप्रिल 2020

दुसऱ्या रुग्णालयात जाताना त्या महिलेची कोपरी पूलावर भर रिक्षातच प्रसूती झाली.

ठाणे ः लॉकडाऊनमुळे कोणावर कोणता प्रसंग ओढवेल हे सांगता येत नाही. ठाण्याच्या कोलबाड नाका परिसरातील एका वॉचमनच्या पत्नीला अनुभवावा लागलेला प्रसंग अचंबित करणारा आहे. प्रसूतीसाठी दोन रुग्णालयांनी नकार दिल्याने रिक्षावाल्याने मदतीचा हात दिला. दुसऱ्या रुग्णालयात जाताना त्या महिलेची कोपरी पूलावर भर रिक्षातच प्रसूती झाली. विशेष म्हणजे बाळाच्या बाळाची नाळ रुग्णालयात आल्यावरच कापण्यात आली. तोपर्यंत बाळाच्या वडिलांनी बाळाला धरुन ठेवले होते.

मोठी बातमी ः कोरोनाशी लढणाऱ्या 100 योद्ध्यांना संसर्ग, पालिकेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीती

ठाण्याच्या कोलबाड नाका परिसरातील सौरभ टॉवर्स येथे वॉचमन असलेले जनक जोशी मूळचे नेपाळचे. त्याच परिसरात एका लहानशा खोलीत ते पत्नी आणि लहान मुलासह राहतात. पत्नी गरोदर असल्याने त्यांना काळजी लागली होती. त्यांना यासंदर्भात मदत करण्याचे आश्वासन रिक्षाचालक मंगेश जाधवने दिले होते. पण त्यावेळी आपल्या बाळाचा जन्म रिक्षात होईल, असे त्यांना वाटले नव्हते. जोशींच्या घराजवळ सरकारी रुग्णालय आहे, पण तिथे कोरोनाचे रुग्ण असल्याने त्यांनी अन्य ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. कळव्यातील रुग्णालयाने ठाण्यातील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रिक्षा ठाण्यात जाण्यासाठी कोपरी पूलावर आली, त्याचवेळी बाळाचा जन्म झाला. जनक याचा मुलगा हे सर्व पाहून गोंधळला, पण त्याला बहिण झाली आहे, असे सांगितल्यावर त्याचा चेहरा खुलला. जनक यांनी रिक्षावाल्यामुळेच सर्व काही सुरळीत घडले असल्याचे सांगितले. 

महत्वाची बातमी ः ऐन लॉकडाउनमध्येही पाळणा हालणार; पण कुठे? वाचा बातमी सविस्तर

बाळाचा जन्म रिक्षातच झाल्यावर मी त्याला तसेच धरले. ठाण्यातील रुग्णालयात गेल्यावर तिथे बाळाची नाळ कापण्यात आली. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी बंदोबस्तावरील सर्व पोलिसांचे आभार मानले. त्यांनी आमची परिस्थिती समजून घेतली आणि फार वेळ न घालावता प्रत्येक चेक पोस्टवरुन जाण्याची मुभा दिली, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lady gives birth in a riksha at kopri thane