ठाण्यातील तलाव आत्महत्येसाठी बदनाम 

दीपक शेलार
रविवार, 8 डिसेंबर 2019

ठाण्यातील तलावात मृतदेह आढळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हेच तलाव नाहक बदनाम झाले आहेत. वर्षभराच्या आकडेवारीकडे पाहिले असता, जानेवारी 2019 ते आतापर्यंत शहरातील विविध तलावात तब्बल 12 मृतदेह आढळल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडे करण्यात आली आहे. यातील बहुतांश जणांनी मानसिक तणावातून तलावात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : शिलाहार काळापासून ब्रिटिश कारकीर्दीनंतर ठाणे शहर तलावांचे शहर गणले जाते. मात्र, ठाण्यातील तलावात मृतदेह आढळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हेच तलाव नाहक बदनाम झाले आहेत. वर्षभराच्या आकडेवारीकडे पाहिले असता, जानेवारी 2019 ते आतापर्यंत शहरातील विविध तलावात तब्बल 12 मृतदेह आढळल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडे करण्यात आली आहे. यातील बहुतांश जणांनी मानसिक तणावातून तलावात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, तलावासभोवती कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्याने अथवा तलावांच्या व्याप्तीचे क्षेत्र मोठे असल्याने पालिकेची सुरक्षा तोकडी पडल्याने अशा घटना घडत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली. 

ठाणे शहरात एकूण 65 तलावांपैकी 33 तलाव अस्तित्वात आहेत. तलावांचे शहर असलेल्या ठाण्यातील मासुंदा तलाव हा ठाणेकरांसह साऱ्यांच्याच आकर्षणाचे ठिकाण आहे. या तलावाच्या चहूबाजूला संरक्षक कठडे उभारून विलोभनीय तलावपाळी बनवली असून या तलावपाळीवर अहोरात्र पर्यटकांचा राबता असतो.

तरीही वर्षभरात या तलावात चौघा जणांनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत. त्याखालोखाल वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव, वर्तकनगर प्रभाग समितीमधील उपवन तलाव आणि कळवा येथील मफतलाल तलावात प्रत्येकी दोघांनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत. 

दरम्यान, ठाण्यातील रेवाळे, मखमली तलाव आणि गोकुळनगर येथील जरीमरी माता मंदिरानजीकच्या तलावात प्रत्येकी एक अशा तिघांनी आत्महत्या केल्याची नोंद पालिकेकडे आहे. यातील जरीमरी तलावात उडी मारलेल्या युवकाला वाचवण्यात ठाणे पालिका अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथकाला यश आले आहे.

अगदी नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात मासुंदा आणि रायलादेवी तलावात दोघांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आत्महत्येसाठी बदनाम झालेल्या तलावांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

नैराश्‍यग्रस्तांना प्रबोधनाची गरज 
ठाणे शहराची ओळख "स्मार्ट शहर' म्हणून हळूहळू होत आहे. त्यातच तलावांचे शहर म्हणूनदेखील ठाणे शहराची ओळख आहे. तरीही हेच तलाव आत्महत्येसाठीचा सुलभ मार्ग म्हणून नागरिकांकडून चोखाळले जात असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. आत्महत्येची कारणे काहीही असली तरी मानसिकदृष्ट्या अथवा शारीरिक आजारांनी ग्रस्त असल्याने काहीजण आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींचे सखोल प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञ व्यक्त करतात.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lake at Thane Infamy for suicide