खंड्याची अखेरची जोडी परतीच्या प्रवासाकडे 

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

कर्नाळा अभयारण्यातील ३ पिल्ले सुदृढ; माता-पित्याकडून उडणे, शिकारीचे प्रशिक्षण

पनवेल : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कर्नाळा पक्षी अभयारण्यात जन्माला आलेली तिबोटी खंड्याची पिल्ले १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर घरट्याच्या बाहेर पडली आहेत. दोन-तीन दिवस माता- पित्याकडून उडणे, शिकारीचे प्रशिक्षण घेऊन ते मूळ भूमी असलेल्या दक्षिण भारतातील वनक्षेत्राकडे परतीच्या प्रवासाला सुरवात करणार आहेत. या अगोदर अभयारण्य परिसरातून सहा जोड्या त्यांच्या पिल्लांसह दक्षिणेकडे रवाना झाल्या आहेत. 

कर्नाळा पक्षी अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून तिबोटी खंड्याच्या जोड्या नित्यनेमाने येतात. चार महिने त्यांचे वास्तव्य असते. या काळात ते अंडी देतात. पक्षिनिरीक्षकांनी या वर्षी अभयारण्यात चार आणि परिसरात तीन जोड्यांची उपस्थिती नोंदवली होती. 
ऑगस्टच्या मध्यावर झालेल्या जोरदार पावसात एका जोडीने पिल्ले आणि घरटे गमावले; मात्र अवघा एक दिवस दु:ख व्यक्त केल्यानंतर त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली. मादीने पुन्हा अंडी दिली. १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही ३ पिल्लांचा जन्म झाला, असेही त्यांनी सांगितले. आता ही जोडी त्यांची काळजी घेत आहे. हे कुटुंब मूळ भूमीकडे रवाना होणार आहे, अशी माहिती पक्षी अभ्यासक ओंमकार खरात यांनी दिली. खेकड्याचे पाय, किडे आणि छोट्या पाली हे या पक्ष्यांचे खाद्य आहे. एका किलोमीटरच्या परिसरात दुसरा खंड्या घरटे बनवत नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The last pair of ruins on the return journey