‘तिरडी’ला वाहून घेतलेला अवलिया

दीपक शेलार
गुरुवार, 12 एप्रिल 2018

ठाणे - ‘सुख के सब साथी, दु:ख में न कोई...’ या अभंगगीतात जीवनाचे सार दडले असले, तरी याला छेद देणारे काही अवलियाही समाजात आढळतात. समाजाने आपल्याला भरपूर दिले आहे. तेव्हा समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने ठाण्यातील कडवा गल्लीत राहणारे लक्ष्मीदास गोकाणी या ७५ वर्षीय निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने अनेक वर्षे अंत्यसंस्कारातील ‘तिरडी’लाच वाहून घेतले आहे. वडिलांकडून पिढीजात अंगीकारलेली त्यांची ही विनाशुल्क निर्व्याज सेवा आजही अव्याहतपणे सुरू असून तिरडी बांधण्याचा हा वारसा आता त्यांचा सुपुत्र रवी यानेदेखील पुढे सुरू ठेवला आहे.

‘अंत्यसंस्कार’ म्हणजे मोठा बाका प्रसंग. एखाद्याचा मृत्यू झाला की, सगेसोयरे, नातलग, मित्रपरिवार आणि शेजारी-पाजारी अशा साऱ्या गोतावळ्याची गर्दी होते; मात्र अंत्यसंस्काराची पूर्व आणि उत्तर तयारी करण्यासाठी जाणकाराची गरज भासते; अन्यथा अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान वादाला तोंड फुटते. प्रसंगी कटू घटनाही घडतात. अंत्यसंस्कारात मृतदेहाला आंघोळ घालण्यापासून तिरडी बांधण्यापर्यंत आणि मृतदेह घरातून कसा बाहेर न्यावा, तो तिरडीवर कोणत्या दिशेला तोंड करून ठेवावा, आदी अनेक प्रश्‍न उपस्थित होत असल्याने उपस्थितांची तारांबळ उडते. हीच निकड लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागात रोखपाल पदावरून निवृत्त झालेल्या गोकाणी यांनी, सेवेत असताना आणि सेवेपश्‍चातही ‘तिरडी’ बांधण्याची जबाबदारी कायम ठेवली आहे. गेली ३५ वर्षे ते हे काम बजावत असून त्यांना हा वारसा त्यांचे वडील रणछोडदास गोकाणी यांच्याकडून मिळाला आहे. भविष्यात त्यांचा पदवीधर सुपुत्र रवी स्वेच्छेने हे काम पार पाडत आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांचा फोन खणाणला की, गोकाणी हातातील काम बाजूला सारून धावतात. 

ठाणे-मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील महाराष्ट्रीय, जैन, मारवाडी, कच्छी, पंजाबी, गुजराती, वागड असो की पटेल वा वाल्मिकी समाज; कुणाच्याही अंत्यसंस्कारात तिरडी बांधण्यासाठी गोकाणी यांचे योगदान असतेच. आजवर हजारहून अधिक मृतांच्या अंत्यसंस्काराची तिरडी बांधल्याचे ते सांगतात. नोकरीत असतानाही गोकाणी गायब झाले म्हणजे कुणाच्या तरी अंत्यसंस्कारासाठी गेल्याचे सहकारी समजत. वरिष्ठांनाही त्यांच्या या कामाची माहिती झाल्याने त्यांना कुणी कधीही आडकाठी केली नाही. याचे फलित म्हणून ठाणे महापालिकेच्या ठाणे गुणीजन, माथाडी युनियन आणि रोटरीच्या पुरस्काराने त्यांना गौरवले आहे.

सध्या वनसंपदा लोप पावत असल्याने स्मशानभूमींत मृतदेहावर लाकडाद्वारे अंत्यसंस्कार करण्यापेक्षा विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार करावेत. जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास टाळता येईल; तसेच भविष्यात तरुणाईला तिरडी बांधण्याच्या प्रात्यक्षिकासह मोफत प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.
- लक्ष्मीदास गोकाणी

Web Title: laxmidas-gokani story