'मुंबईत नालेसफाई की हात सफाई'; विरोधीपक्ष नेत्याचा पालिका आयुक्तांना सवाल..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

'नालेसफाई  की हात सफाई' अशी शंका उपस्थित करून पालिकेला चुना लावणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पालिका विरोधी पक्षांनी केली आहे . 

मुंबई : नालेसफाईची  कामे ११३ टक्के झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र हा दावा खोटा असून आजही अनेक मोठ्या नाल्यात गाळ साचलेला आहे. याप्रकरणी आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून अधिका-यांमार्फत नालेसफाईची कामे पूर्ण करून घ्यावीत. 'नालेसफाई  की हात सफाई' अशी शंका उपस्थित करून पालिकेला चुना लावणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पालिका विरोधी पक्षांनी केली आहे . 

 यंदा नालेसफाईच्या कामांबाबतचे टेंडर उशिराने काढण्यात आले. त्यामुळे नालेसफाईच्या कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली. पालिका दरवर्षी या नालेसफाईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही संबंधित अधिका-यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून पालिका आयुक्तांना नालेसफाईची कामे ११३ टक्के झाल्याची खोटी माहिती दिली. त्यामुळे आजही नाल्यात ५-६ फूट इतका गाळ बाकी असल्याचा दावा पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. 

हेही वाचा: कोरोनाग्रस्त पोलिसांसाठी आता डॉक्टरांचे विशेष पथक; आणखी एका पोलिसाचा मृत्यू.. 

आपण स्वतः २९ व ३० जून रोजी मुंबईतील काही मोठ्या नाल्यांची पाहणी केली. त्यावेळी नाल्यांची सफाई अर्धवट झाल्याचे व नाल्यांमध्ये अद्यापही गाळ बाकी असल्याचे रवी राजा यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

 नालेसफाई योग्यरीत्या झाली नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी  आहेत. त्याची दखल घेऊन आपण स्वतः २९ व ३० जून रोजी सायन येथील प्रेमनगर नाला, गोवंडी येथील शिवाजी नगर नाला, वडाळा येथील कोरबा मिठागर नाला, कुर्ला येथील मिठी नदी, घाटकोपर येथील लक्ष्मीबाग नाला, घाटकोपर येथीलच सोमय्या नाला, अंधेरी येथील इंडियन ऑइल नाला, मालाड येथील वळनाई नाला, गोरेगाव येथील ओशिवरा नाला, कांदिवली येथील लालजीपाडा नाला, बोरिवली येथील गोराई नाला, वांद्रे, खेरवाडी येथील चमडावाडी नाला आदी नाल्यांची पाहणी केली. यावेळी, सदर नाल्यांमध्ये गाळाची पडताळणी करून पाहिले असता मोठ्या प्रमाणात गाळ बाकी असल्याचे निदर्शनास आल्याचे राजा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: अरे वाह!! लॉकडाऊनमध्येही 'बेस्ट' सुसाट; बेस्टचे रोजचे उत्पन्न तब्बल 'इतक्या' लाखांवर..

पालिकेने ११३ टक्के नालेसफाईची कामे झाल्याचा दावा केला असेल तर प्रत्यक्ष पाहणीत नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ कसा असा सवाल त्यांनी केला आहे. नालेसफाईची कामे अर्धवट झाली असून कंत्राटदारांच्या  'हात की सफाई' प्रकरणी चौकशी करून दोषी कंत्राटदारांना त्याच्या कामाचे बील न देता, त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणीही  राजा यांनी केली आहे.
leader of opposition of bmc asked question to city commissioner 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leader of opposition of bmc asked question to city commissioner