'जनतेचं काहीही होऊ द्या, पण मी पुन्हा येईन'!- जयंत पाटील यांचे टीकास्त्र

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

"कोरोनाच्या संकटात राज्यातील जनतेचे जे होईल ते होईल; मात्र मी परत सत्तेत येईन' यासाठी सुरू असलेले विरोधी पक्षाचे प्रयत्न म्हणजे कोत्या मनाची मानसिकता दर्शवते, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पाटील यांनी झूम ऍपवरून पत्रकार परिषदेला संबोधित केले.

मुंबई : "कोरोनाच्या संकटात राज्यातील जनतेचे जे होईल ते होईल; मात्र मी परत सत्तेत येईन' यासाठी सुरू असलेले विरोधी पक्षाचे प्रयत्न म्हणजे कोत्या मनाची मानसिकता दर्शवते, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पाटील यांनी झूम ऍपवरून पत्रकार परिषदेला संबोधित केले. या वेळी बोलताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती, आर्थिक संकटाचा भविष्यकाळ आणि अशा संकटाच्या काळात विरोधी पक्ष भाजपच्या सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्या यावर जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली.

ही बातमी वाचली का? 'मुळशी पॅटर्न'च्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत... 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत जाण्यासाठी राज्यपालांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, की त्यांना हा प्रस्ताव मान्य करावा लागेल. कारण घटनात्मकदृष्ट्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा राज्यपालांना फार काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. पत्रावर त्यांना सकारात्मक निर्णय घ्यावाच लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सक्षम असून, ते आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. याचदरम्यान भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते हे सरकार कोसळणार या भावनेतून सुरुवातीपासूनच टपलेले आहे. याचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी विरोधी पक्षाच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष वेधले. 

ही बातमी वाचली का? खवय्यांसाठी खुशखबर...कोकणचा हापूस आता थेट तुमच्या दारी!

सत्तेत येण्याची विरोधकांना अत्यंत घाई झालेली असून, महाविकास आघाडीने आपल्या समन्वयातून चालवलेला कारभार पाहता भारतीय जनता पक्षात नैराश्‍य दाटून आले आहे. पक्षाच्या नेत्यांना या नैराश्‍यातून बाहेर काढण्यासाठी सत्ता येणार अशा प्रकारची आवई उठवण्याबाबत हा पक्ष माहिर असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाशी झगडत असताना भाजप मात्र सत्तेत येण्याची संधी शोधत आहे. हे दुर्दैवी असून महाविकास आघाडीने आपल्या सत्तेचा खुंटा बळकट केला आहे. तो आता पुढील 15 वर्षे कायम राहील, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Let anything happen to the people, but I will come again'! - Jayant Patil criticizes opponents