पोलिसांच्या गणवेश बदलाबाबत विचार करू; अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण 

अनिश पाटील
Sunday, 17 January 2021

पोलिसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा असून, त्यात बदल करावेत, अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केली. या मागणीचा विचार करू, अशी सकारात्मक प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली

मुंबई  ः पोलिसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा असून, त्यात बदल करावेत, अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केली. या मागणीचा विचार करू, अशी सकारात्मक प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील पोलिस दलाचे सक्षमीकरण करताना करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करतानाच पोलिसांच्या वैयक्तिक आशा-आकांक्षा आणि समस्यांची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील सेवानिवृत्त पोलिस महासंचालक आणि मुंबईचे पोलिस आयुक्त यांची बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह ओ. पी. बाली, संजीव दयाळ, प्रवीण दीक्षित, सतीश माथूर, पी. एस. पसरिचा, डी. शिवानंद, डी. एन जाधव हे सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते. 
संपूर्ण आयुष्य राज्यातील विविध शहरांत सेवा केलेल्या आणि पोलिस दलाची अगदी तळापासून माहिती आणि अभ्यास असणाऱ्यांना अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अनुभवाचा उपयोग पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते, असे गृह मंत्र्यांनी सांगितले. या वेळी अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या विविध समस्या सांगितल्या. कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनांवरही चर्चा केली. 

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

राज्याचे माजी पोलिस महासंचालक जे. एफ. रिबेरो यांनी पोलिसांवर अतिरिक्त ताण येत असल्याने पोलिसांची ड्युटी आठ तास करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कायद्याच्या चौकटीत प्रत्येक पोलिस युनिटला आवश्‍यक स्वायत्तता आणि अधिकार द्यावेत, अशी अपेक्षा माजी पोलिस महासंचालक अनामी रॉय यांनी व्यक्त केली. यावर देशमुख म्हणाले, राज्यातील पोलिस दल एक कुटुंब समजून गृह विभाग काम करत आहे. निवृत्त अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि अभ्यासाचा उपयोग करून पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी संवाद साधला. संवादाची ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार असून, त्यातून अनेक नवनवीन कल्पना पुढे येतील. त्यातून पोलिस दलाची कार्यक्षमताही वाढेल. 

कापड वातावरणाशी सुसंगत हवे! 
माजी पोलिस महासंचालक डी. शिवानंद यांनी सुचविले की, पोलिसांच्या शर्ट आणि पॅंटसाठी एकच कापड वापरले जाते. ते भारतीय वातावरणाशी सुसंगत नसल्याने बदलण्याची गरज आहे. शर्टच्या आत मोबाईल, डायरीही बसत नाही. त्यामुळे गणवेशामध्ये हाफ जॅकेटचा समावेश करावा. तसेच पाठीमागच्या बाजूला युनिटचे नाव लिहावे. पोलिसांना लेदर बुटामुळे आरोपीचा पाठलाग करणे अवघड होते. त्यामुळे रंगाचे स्पार्टस्‌ बूट द्यावेत. 

Lets think about changing police uniforms Home Ministers explanation after the demand of the officials

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lets think about changing police uniforms Home Ministers explanation after the demand of the officials