यंदा महापरिनिर्वाणदिनाचे थेट प्रक्षेपण; शिवाजी पार्कवर नागरी सुविधा नाही

समीर सुर्वे
Saturday, 21 November 2020

: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे यंदा थेट प्रक्षेपण ऑनलाईन तसेच प्रसिद्धिमाध्यमांमार्फत करण्यात येणार आहे

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे यंदा थेट प्रक्षेपण ऑनलाईन तसेच प्रसिद्धिमाध्यमांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच दर वर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथेही कोणत्या प्रकारची नागरी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अद्याप नियमावली तयार केलेली नाही. शासकीय मानवंदना तसेच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून शिवसेना कोंडीत? महाविकास आघाडीवर भाजपची टीका

महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात; मात्र यंदा कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजी पार्क येथे कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध करून न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या चैत्यभूमीची किरकोळ डागडुजी, रंगरंगोटी, दिवाबत्ती तसेच पुष्प सजावटीची कामे सुरू आहेत. या कामाचा आढावा आज महापालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. तसेच शेजारील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचीही पाहणी जयस्वाल यांनी केली. या वेळी उपायुक्त विजय बालमवार, सहायक आयुक्त किरण दिघावकर, शरद उघडे उपस्थित होते. 

हेही वाचा - ठाण्यातील जाहिरात बॅनर होर्डीग्जची चौकशी; अनाधिकृत होर्डींग्जना दणका

महापालिका आणि राज्य सरकारने महापरिनिर्वाण दिनासाठी अद्याप नियमावली जाहीर केली नाही; मात्र कोव्हिडच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सध्या महापालिका नियोजन करत आहे. त्यामुळे यंदा मैदानात कोणत्याही नागरी सुविधा न पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांमार्फत थेट प्रक्षेपण होणार आहे. अनुयायांना आपल्या घरी बसून पाहता येणार आहे. अनुयायांना स्थानिक स्तरावरून अभिवादन करता येईल. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येता अनुयायांनी अभिवादन करणे शक्‍य व्हावे म्हणून थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. 
- संजीव जयस्वाल,
अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका  

Live broadcast of Mahaparinirvana Day this year There is no civic amenity at Shivaji Park 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Live broadcast of Mahaparinirvana Day this year There is no civic amenity at Shivaji Park