esakal | ...अन लहानग्यांना फुटला मायेचा पाझर 
sakal

बोलून बातमी शोधा

...अन लहानग्यांना फुटला मायेचा पाझर 

. तीन-चार दिवसांपूर्वी एका भटक्‍या कुत्रीने 9 पिल्लांना जन्म दिला. दुसऱ्या दिवशी कुत्री मृतावस्थेत आढळली. तिची ती पिल्ले त्या मेलेल्या आईच्या कुशीत भुकेने विव्हळताना लहान मुलांनी पाहिले. लागलीच बच्चे कंपनी कामाला लागली. 

...अन लहानग्यांना फुटला मायेचा पाझर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : "लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा'... प्रत्येकाला आपले लहानपण पुन्हा एकदा अनुभवायचे असते. आजचा घडलेला प्रसंग, मोठ्यांनी खरंच लहानांकडून शिकावे असाच काहीसा... काही लहान मुले "सेव्ह पपीज्‌'चा गल्ला घेऊन भर उन्हात फिरून पैसे गोळा करीत होती. नक्की प्रकार काय आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. तीन-चार दिवसांपूर्वी एका भटक्‍या कुत्रीने 9 पिल्लांना जन्म दिला. दुसऱ्या दिवशी कुत्री मृतावस्थेत आढळली. तिची ती पिल्ले त्या मेलेल्या आईच्या कुशीत भुकेने विव्हळताना लहान मुलांनी पाहिले. लागलीच बच्चे कंपनी कामाला लागली. 

ही बातमी वाचा ः आणि विद्यार्थ्यांनी आगीच्या लोळातून धूम ठोकली..
खेळासाठी जमलेली टीम आता त्या पिल्लांपाशी एकवटली. नेमके काय करावे, हे कुणालाच कळेना. शेवटी त्यातील काहींनी दुकानातून पुठठ्याचा बॉक्‍स आणला. कुणीतरी घरच्यांच्या नकळत घरातील जुने कपडे आणले. मग पिल्लांना अलगद उचलून बाजूला ठेवले. तोपर्यंत हा प्रकार इतरांच्याही लक्षात आला. मोठ्यांच्या मदतीने मृत कुत्रीचा अंत्यविधी केला. आता प्रश्न असा होता, की या लहान पिल्लांचे करायचे तरी काय? लहान मुलांनी एकत्र येऊन पिल्लांचे पालकत्व स्वीकारले. त्यानंतर ंमुलांनी पिल्लांसाठी एक छान जागा निवडली. डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांना कसे हाताळावे हे समजेना; मग सर्व मंडळी गावातील एका प्राणिमित्रांच्या घरी पोहोचली. त्या मित्रांच्या मदतीने मुलांनी पिल्लांची साफसफाई केली आणि त्यांना आसरा दिला. 

पिल्लांसाठी सेव्ह पपीज 
लहानग्यांनी खाऊचे पैसे एकत्र केले. एक मिलर विकत घेतला. त्यावर "सेव्ह पपीज्‌'चा कागद लावला आणि स्वारी निघाली कामगिरी पार पाडायला. एक रुपयापासून ते यथाशक्ती मदत करणारे भेटत गेले. जमलेल्या पैशातून दूध आणि औषधांची सोय झाली. ती लहान मुले, पिल्लांना मांडीवर घेऊन दूध पाजत होती. खरंच हा क्षण मनाला कुठेतरी सुखावून गेला. माणुसकी अजूनही संपलेली नाही. आता ती लहान मुले एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या शोधात आहेत; जी त्या पिल्लांची योग्य काळजी घेऊ शकेल. एखादी स्वयंसेवी संस्था किंवा प्राणी संघटना मदतीला येईल का, याचा मुले शोध घेत आहेत. 

loading image