युतीच्या घोषणेमुळे शिवसेनेचा मार्ग सुकर

मयूरी चव्हाण-काकडे
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

युतीच्या घोषणेमुळे कल्याण मतदारसंघातील शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात शांतता पसरली आहे. आघाडीला ‘मनसे’च्या ‘इंजिन’मुळे गती मिळाल्यास ‘आगरी कार्ड’च्या बळावर चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

युतीच्या घोषणेमुळे कल्याण मतदारसंघातील शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात शांतता पसरली आहे. आघाडीला ‘मनसे’च्या ‘इंजिन’मुळे गती मिळाल्यास ‘आगरी कार्ड’च्या बळावर चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

शिवसेनेतून २००९ मध्ये आनंद परांजपे निवडून आले होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या वाटेवर गेले. २०१४ मध्ये ते ‘घड्याळ’ चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरले; मात्र मतदारांना त्यांचे पक्षांतर रुचले नाही. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परांजपे यांचा पराभव केला. लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत पुत्र श्रीकांत यांच्यासाठी पालकमंत्री शिंदे यांनी ‘फिल्डिंग’ लावत इतर पक्षांशीही जुळवून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध आहेत. याचा फायदा घेत अलीकडे अनेक प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या. शिवसेनेसाठी ही जमेची बाजू ठरण्याची शक्‍यता आहे.

कळवा-मुंब्रा परिसरामध्ये मुस्लिम, तर कल्याण ग्रामीणमध्ये आगरी, कोळी आणि कुणबी समाजाचा प्रभाव आहे. उल्हासनगरमध्ये सिंधी मते निर्णायक ठरू शकतात. अंबरनाथमध्ये आगरी-कोळी समाजासह कोकणी, कुणबी मते अधिक आहेत. कल्याण पूर्व, दिवा आणि कल्याण ग्रामीण भागात उत्तर भारतीयांची संख्या अधिक आहे. डोंबिवली शहरात ब्राह्मण, कोकणी, आगरी समाजाचा प्रभाव आहे. कोकणी आणि ब्राह्मण समाजाची मते खेचण्याचा प्रयत्न शिवसेनेला करावा लागणार आहे. 

आनंद परांजपे पुन्हा रिंगणात उतरण्यास इच्छुक नसल्याने, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे श्रीकांत यांच्याविरोधात लढण्यासाठी सध्यातरी तुल्यबळ उमेदवार दिसत नाही. त्यामुळे युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. पालकमंत्री शिंदे यांचा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्कही पुत्राच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरेल.

मतदारांमधील नाराजीची कारणे 
    ग्रामीण भागातील रस्ते, पाण्याचा प्रश्‍न 
    एमआयडीसी परिसराची झालेली वाताहत 
    जमिनींच्या मुद्द्यांवरून भूमिपुत्रांचा असंतोष 
    २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा रखडलेला प्रश्‍न 
    आरोग्यसेवेचा उडालेला बोजवारा 
    रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे रखडलेले काम  

२०१४ मधील मतविभाजन
     डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना) - ४,४०,८९२ (विजयी)
    आनंद परांजपे (राष्ट्रवादी) - १,९०,१४३
    प्रमोद (राजू) पाटील (मनसे) - १,२२,३४९
    नरेश ठाकूर (आप) - २०,३४७
    दयानंद किरतकर (बसपा) - १९,६४३

Web Title: Loksabha Election 2019 Kalyan Constituency Yuti Shivsena BJP Politics