Voter List : मतदारयादीत मृत व्यक्ती, बाहेरील मतदारांची नावे; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची तक्रार

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. निवडणूक जवळ आल्या तरी मतदारयादीतील नावांचा घोळ मात्र कायम.
Voters List
Voters Listesakal

डोंबिवली - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. निवडणूक जवळ आल्या तरी मतदारयादीतील नावांचा घोळ मात्र कायम आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागात दुसऱ्या प्रभागातील मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच मृत व्यक्तींची नावे देखील यादीत तशीच आहेत.

एवढेच नाही तर चक्क गुजराती भाषेत काही नावे ही यादीत दिली गेली असून ही बाब आक्षेपार्ह असून ती दुरुस्ती करावी अशी तक्रार शिवसेनेचे माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदासंघाच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यात डोंबिवली पूर्वकडील एमआयडीसी निवासी प्रभाग याद्यांची छाननी केली असता त्यात शंभरावर जास्त नावे ही प्रभागातील नागरिकांची नसल्याचे पाहण्यास मिळाले आहेत.

माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सदर मतदार याद्यांतील नावे व त्याच्या पत्त्यावर जागेवर जाऊन बघितले असता सदर व्यक्ती तेथे राहत नसल्याचे दिसण्यात आले. त्याव्यक्ती एमआयडीसी निवासी प्रभाग राहत नसून दुसऱ्या प्रभागात राहतात.

ही बाब अत्यंत गंभीर असल्याने याबाबतीत मतदार नोंदणी अधिकारी, कल्याण ग्रामीण विधानसभा यांच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांनी याबाबतीत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन म्हात्रे यांना देण्यात आले.

मतदार यादीत एका ठिकाणी निवासी विभागातील बंगल्याच्या प्लॉट क्रमांक इत्यादी पत्ता असलेल्यावर भलत्याच व्यक्तीचे नाव बघून सदर बंगल्याच्या मालकाने त्याबाबत विद्युत/पाणी बिलाच्या पुराव्यानिशी तक्रार, मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे केली आहे.भविष्यात या मालमत्ता (बंगला) विषयी मालकी वाद उत्पन्न होऊ नये अशी त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

प्रभाग बाहेरील नागरिकांची मतदार नोंदणी करताना दिलेल्या कागदपत्राची सखोल चौकशी करून जर ते बोगस खोटे दिल्याचे सिध्द झाले तर त्यांची मतदार नोंदणी रद्द करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास माजी नगरसेवक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांचे एक शिष्टमंडळ हे मतदार नोंदणी अधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतील आहे.

मतदार यादीत असंख्य नावे ही दोनदा आली आहेत. तसेच काही मृत व्यक्तींची नावे पण आहेत. सदर ही नावे वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मतदार यादीत काही स्थानिक मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत असूनही त्यांच्यावर डिलीट शिक्का मारण्यात आला आहे.

या मतदार यादीत काही नावे ही गुजराती भाषेतून दिली असल्याचे दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यात गुजराथी भाषेला इतके महत्त्व का दिले जात आहे ? एकंदर मतदार यादीत बराच घोळ झाला असून अशा मतदार याद्यांमुळे मतदानाचा टक्का वाढणार कसा असा प्रश्न माजी नगरसेवक म्हात्रे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com