पेण अर्बन बॅँक ठेवीदारांचा 9 ऑगस्टला मोर्चा

नरेश पवार : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

बॅंकेत सुमारे 758 कोटींच्या ठेवींची लूट झाल्याचे उघडकीस आले होते. या घटनेला आता 10 वर्षे होत आली तरी सतत संघर्ष करीत असलेले लाखो ठेवीदार अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी 400 पेक्षा अधिक ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ठेवीदारांना न्याय देण्याबाबत प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेबद्दल बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. 

पेण : पेण अर्बन बॅंकेतील 758 कोटी रुपयांच्या घोटाळ्यास 10 वर्षे पूर्ण होत आली तरी ठेवीदारांना न्याय मिळत नसल्याने ठेवीदार संतप्त आहेत. त्यामुळे ते 9 ऑगस्टला क्रांतिदिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. 

पेण अर्बन बॅंक संघर्ष ठेवीदार आणि खातेदारांची सभा नुकतीच पेण येथे झाली. या वेळी समितीचे अध्यक्ष आमदार धैर्यशील पाटील, कार्याध्यक्ष नरेन जाधव, सेक्रेटरी चिंतामण पाटील, याचबरोबर समितीचे पदाधिकारी आणि सर्व शाखांचे प्रमुख ठेवीदार प्रतिनिधी उपस्थित होते. 

बॅंकेत सुमारे 758 कोटींच्या ठेवींची लूट झाल्याचे उघडकीस आले होते. या घटनेला आता 10 वर्षे होत आली तरी सतत संघर्ष करीत असलेले लाखो ठेवीदार अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी 400 पेक्षा अधिक ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ठेवीदारांना न्याय देण्याबाबत प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेबद्दल बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. 

आतापर्यंत केवळ चार कोटी रुपयांची वसुली प्रत्यक्षात झाली आहे. यावरून तपास यंत्रणा व वसुली प्रक्रिया किती कुचकामी ठरली आहे, याची दखल सरकारने घ्यावी म्हणून शुक्रवारी 9 ऑगस्टला हजारो ठेवीदारांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. 

बॅंकेवर शासन नियुक्त प्रशासक मंडळातील एक ठेवीदार प्रतिनिधी नरेंद्र तथा बंधू साखरे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर संघर्ष समितीने सुचविलेले सेक्रेटरी चिंतामण पाटील (रा. खोपोली) यांच्या नियुक्तीचा आदेशही तातडीने काढावा, अशा मागण्या ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने केल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Long march of Pen urban bank