अतुल शहा यांना "लॉटरी'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

टेंडर मतांची मागणी फेटाळल्याने शिवसेनेला फटका

टेंडर मतांची मागणी फेटाळल्याने शिवसेनेला फटका
मुंबई - अटीतटीच्या लढतीत प्रभाग क्र.220 चे भाजपचे उमेदवार अतुल शहा यांना "लॉटरी' लागली. फेरमतमोजणीतही समान मते पडल्यानंतर साडेचार तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर शहा यांना विजयी घोषित करण्यात आले. लॉटरी पद्धतीने त्यांनी हा विजय मिळवल्याने मुंबादेवीतील प्रभागात कमळ फुलले आहे. प्रभागात असलेली पाच टेंडर व्होट फोडण्यास नकार दिल्याने शिवसेनेला फटका बसल्याचे बोलले जात आहे.

मुंबादेवी आणि मलबार हिलमध्ये शिवसेना-भाजप यांच्यात मुख्य लढत होती. गुरुवारी (ता. 23) मुंबई गिल्डर लेनमध्ये झालेल्या मतमोजणीत दुपारी 12.30च्या सुमारास प्रभाग क्रमांक 220 चा निर्णय जाहीर करण्यात आला. शहा यांना विजयी घोषित करण्यात आले होते; मात्र शिवसेनेने फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी फेरमतमोजणी केली. दोन्ही उमेदवारांच्या चेहऱ्यावर तणाव होता. बाराव्या फेरीत बागलकर यांना 5,853, तर शहा यांना 5,313 मते मिळाली. त्या वेळी बागलकर विजयी होणार असे वाटत होते. तेराव्या फेरीत शहा यांनी कसर भरून काढत बागलकर यांच्या इतकीच म्हणजे 5 हजार 946 मते मिळवली. समान मत पडल्याने निवडणूक अधिकारीही चक्रावले. त्यानंतर 3 वाजता शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, खासदार अनिल सावंत, संजय राऊत हे मतमोजणी केंद्रावर आले. त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पाच टेंडर मते न्यायालयाच्या न्यायामूर्तींसमोर उघड करावी, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. त्याच वेळी उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे मतमोजणी केंद्रावर पोहचले. तावडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केली. थोड्याच वेळात आमदार मंगलप्रभात लोढाही पोहचले. या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर "लॉटरी' काढण्यास दोन्ही उमेदवारांनी होकार दिला.

दोन्ही उमेदवारांचा जप
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता 6.30 मिनिटांनी मतमोजणी केंद्रावर आले. त्यांनी दोन्ही उमेदवारांना नियमावली वाचून दाखवली. चिठ्ठी काढण्यासाठी पालिका कर्मचारी रमेश फणसवाडीकर यांची नात यशिका साळुंखे हिला मंचावर बोलवण्यात आले. तिने काढलेल्या चिठ्ठीत शहा यांचे नाव आले. त्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आले. हे नाट्य सुरू असताना दोन्ही उमेदवार तणावात होते. शहा यांनी "हनुमान चालिसा', तर बागलकर यांनी स्वामी समर्थांचा जप सुरू केला होता.

विजयानंतर हनुमंतानेच आपल्यावरील संकट दूर केले. विजयाचे श्रेय मुख्यमंत्र्यांसह कार्यकर्त्यांचे आहे.
- अतुल शहा, भाजप

आयुक्तांनी दिलेला निर्णय मान्य आहे. न्यायालयीन लढाईचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. टेंडर व्होटचा मान राखायला पाहिजे.
- सुरेंद्र बागलकर, शिवसेना

पाच टेंडर मत ठरली घातक
मुंबईत पहिल्यांदाच उमेदवाराची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात आली. प्रभाग क्रमांक 220 मध्ये पाच ही टेंडर मत आहेत. ती टेंडर मतेच शिवसेनेला घातक ठरली. नाम साधर्म्य असलेल्या दोन व्यक्तींनी मतदान केल्यास अशी मते टेंडर मते म्हणून ग्राह्य धरली जातात; मात्र ही टेंडर मते सीलबंद लिफाफ्यात बंदच राहिली.

Web Title: lottery to atul shaha