ई-टॉयलेटचे ज्ञान पचनी पडेना!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

महाड नगरपालिकेने महाड व परिसरात उभारलेले ई-टॉयलेट्‌स नागरिकांच्या पचनी पडताना दिसत नाहीत. टॉयलेट वापरणाऱ्या नागरिकांना त्याचा वापर कसा करावा? याचे ज्ञान नसल्याने एक टायलेट सध्या बंद पडले आहे.

महाड (बातमीदार) : महाड नगरपालिकेने महाड व परिसरात उभारलेले ई-टॉयलेट्‌स नागरिकांच्या पचनी पडताना दिसत नाहीत. टॉयलेट वापरणाऱ्या नागरिकांना त्याचा वापर कसा करावा? याचे ज्ञान नसल्याने एक टायलेट सध्या बंद पडले आहे.

महाड नगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर देशामध्ये चांगले नाव कमावले आणि पुरस्कारही मिळवले आहे. अशाच स्वच्छता अभियानामध्ये एक पाऊल पुढे टाकण्यासाठी पालिकेने महाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लायन्स क्‍लब या ठिकाणी दोन ई-टॉयलेटची उभारणी केली. मोठ्या शहरात असणारी ई-टॉयलेट्‌स महाडमध्ये पालिकेने उभी करून आधुनिकतेकडे पाऊल टाकले. 

महाड हे तालुक्‍याचे ठिकाण असल्यामुळे व या ठिकाणी बाजारपेठ आणि इतर सरकारी कार्यालय असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची व प्रवाशांची कायम वर्दळ असते. येथे स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. स्वच्छतागृहाची असणारी गरज लक्षात घेता पालिकेने या ठिकाणी दोन ई-टॉयलेट्‌स बांधली आहेत. याचा वापर ऑगस्टपासून सुरू करण्यात आला.

ई-टॉयलेट ही पूर्णपणे स्वयंचलित असल्याने त्यांचा वापर योग्य तऱ्हेने करावा लागतो. या ठिकाणी बॉक्‍समध्ये पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर दरवाजा उघडण्यापासून ते पूर्ण स्वच्छता करण्यापर्यंत सर्व कामे स्वयंचलित यंत्रणेने होत असतात. यासाठी काही बटणांचा वापर करावा लागतो. परंतु, ग्रामीण भागातील नागरिकांना या टॉयलेटबाबत व्यवस्थित ज्ञान नसल्याने या ठिकाणी येणारा उपयोगकर्ता कोणत्याही प्रकारचे बटण दाबत असल्याने; तसेच दरवाजा मोठ्याने उघडझाप करत असल्याने यापैकी एक टॉयलेट्‌स नादुरुस्त झाले आहे. ही टॉयलेट आधुनिक असल्याने त्याचे सेंसर सध्या काम करत नसल्याने एक टॉयलेट नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी वारंवार होणारी अडचणी लक्षात घेता नगरपालिका आता या ठिकाणी केअरटेकर नेमण्याच्या ही तयारीत आहे.

ई-टॉयलेट कशी वापरावीत, याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन लिखित स्वरूपात त्या ठिकाणी दिलेले आहे. परंतु, तरीही वापरणाऱ्यांना याबाबत अडचणी येत आहेत. हे लक्षात घेऊन या ठिकाणी केअरटेकर नेमण्याच्या मनस्थितीत नगरपालिका आहे.
- सुहास कांबळे, नगर अभियंता, महाड नगर परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahadkar people don't know how to use e-toilets