esakal | सिद्धिविनायकला क्यूआर कोड तर महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धिविनायकला क्यूआर कोड तर महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही

मुंबईतील मंदिरे, हाजीअली दर्गा भाविकांसाठी उघडला आहे. सिद्धीविनायक मंदिरात प्रवेशासाठी अॅप डाऊनलोड करून अॅपॉईंटमेंट आणि क्यूआर कोड आवश्यक असेल. कोठेही मंदिरात प्रसाद स्विकारला जाणार नाही वा दिला जाणार नाही, आरतीला देखील भाविक नसतील.

सिद्धिविनायकला क्यूआर कोड तर महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबईः  मुंबईतील मंदिरे, हाजीअली दर्गा भाविकांसाठी उघडला आहे. सिद्धीविनायक मंदिरात प्रवेशासाठी अॅप डाऊनलोड करून अॅपॉईंटमेंट आणि क्यूआर कोड आवश्यक असेल. कोठेही मंदिरात प्रसाद स्विकारला जाणार नाही वा दिला जाणार नाही, आरतीला देखील भाविक नसतील. फक्त मुखदर्शनावर भाविकांना समाधान मानावे लागेल. 

तयारीला वेळ कमी मिळाला तरी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली. भाऊबीजेनंतर मंदिरे खुली करायला हवी होती, कारण तयारीला वेळच मिळाला नाही, असेही बोलले जात आहे. आठवड्याभराचा अनुभव पाहून आणखी बदल करण्याचे व्यवस्थापनाने ठरविले आहे. दहा वर्षांखालील मुले, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रीया आदींना प्रवेश मिळणार नाही. 

हाजीअली तीनदा नमाज

माहिम दर्ग्याला आयएओ प्रमाणपत्र असल्याने आमचे नियमही आहेतच. सोशल डिस्टन्सिंग तसेच आरोग्यविषयक सरकारी नियम पाळण्यासाठी लोकांना रांगांमधून कसे आत सोडावे, प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग वेगवेगळा असावा, सीसीटीव्ही मार्फत सर्वत्र लक्ष ठेवावे यासंदर्भात समन्वय साधला जाईल. किंबहुना शुक्रवारच्या नमाजासाठीही एकाचवेळी गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जाईल, असे हाजीअली आणि माहिम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खांडवानी यांनी सकाळला सांगितले. भाविकांची श्रद्धा आणि उत्सुक्तता आम्ही समजू शकतो. मात्र नियम पाळून त्यांनीही सहकार्य करावे. हाजीअली दर्ग्याची स्वच्छता रोज सुरु होतीच, आता दिवसातून तीनदा स्वच्छता होईल. गर्दीचा ताण चार पाच दिवस राहील, मग सर्वकाही सुरळित होईल. गर्दी फारच वाढली तर आधीच वेळेचे बुकिंग करून प्रवेश द्यायचाही प्रस्ताव आहे. शुक्रवारची नमाजही दोन ते तीन वेळा करण्यात येईल, ज्यायोगे एकदम भाविकांची गर्दी होणार नाही, असेही खांडवानी म्हणाले. 

मुंबादेवी पावतीची देणगीही नाही
 
मुंबादेवीच्या बाहेर सहा फुटांवर खुणा करण्यात आल्या असून भाविकांना तेथेच उभे रहावे लागेल. प्रवेशापूर्वी सॅनिटायझिंग टनेलमधून जावे लागेल. मंदिरात देवीला प्रसाद, फुले, नारळ वाहण्यात येणार नाही याची कल्पना स्टॉलवाल्यांनाही दिली आहे. दानपेटी खुली असली तरी उद्याचा दिवस पावतीच्या देणग्या स्वीकारल्या जाणार नाहीत. तेथेही कर्मचारी आणि भाविक यांचा संपर्क न येण्याची तयारी करून मगच ती सोय केली जाईल. मंदिरात कोठेही भाविक आणि कर्मचारी यांचा संपर्क येणार नाही याची काळजी घेतली आहे, असे मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी सकाळला सांगितले. फक्त सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळातच दर्शन मिळेल, असेही ते म्हणाले. 

महालक्ष्मी गाभाऱ्यात प्रवेश नाही

आरोग्यविषयक आणि सोशल डिस्टंन्सविषयक सरकारचे सर्व नियम पाळले जातील, मास्क अत्यावश्यक असेल. पुजारी-कर्मचारी यांच्याशी भाविकांचा संपर्क येऊ नये म्हणून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही, गाभाऱ्याच्या दारातूनच दर्शन घेता येईल, असे महालक्ष्मी मंदिराचे महाव्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये म्हणाले. 

सिद्धिविनायक टेंपल अॅप मार्फतच मंदिरात प्रवेश

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात प्रवेशासाठी मंदिराचे अॅप डाऊनलोड करून आगाऊ वेळ आणि क्यूर आर कोड घेऊनच जावे लागेल. तासात शंभर याप्रमाणे आज फक्त एक हजार भाविकांना प्रवेश मिळेल.  

सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने सिद्धिविनायक टेंपल हे अॅप बनविले असून मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोबाईलवर हे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. या अॅपवर नोंदणी केल्यानंतरच भाविकांना मंदिरात प्रवेश निश्चित करण्यात येणार असल्याचे सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.

मोबाईलवर हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर लगेचच मोबाईल स्क्रीनवर क्यूआर कोड मिळेल. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना कयूआर कोड स्कॅन करावा लागेल त्यानंतर थर्मल तपासणी करून मगच मंदिरात दर्शनासाठी जाता येईल. ज्यांच्याकडे मोबाईल नसेल त्यांच्यासाठी मंदिर प्रवेशद्वाराजवळ स्वतंत्र सेवा सुरू करण्यात येणार असून या काउंटर जवळ भाविकांची नोंदणी केली जाईल.

मंदिर सकाळी ७ वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येईल तासाला केवळ १०० भाविकांनाच मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येईल तर दिवसभरात १ हजार भाविकांना दर्शन घेता येईल अशी सुविधा करण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितले.

मंदिरात येताना भाविकांनी मास्क परिधान करणे तसेच मंदिराच्या आतमध्ये भविकांमध्ये सहा फुटांचे अंतर राखण्यात येईल, मंदिरात येताना कुणीही मौल्यवान वस्तु आणू नये असे आव्हान न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Maharashtra Devotees visit Mumbai Siddhivinayak Temple as religious places reopen in the State today

loading image