esakal | महाराष्ट्रातील लॉकडाउनमध्ये १५ मे पर्यंत वाढ; राजेश टोपेंची माहिती

बोलून बातमी शोधा

Lockdown
  • कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने केली वाढ

  • ऑक्सिजन, रेमडेसिवीरबद्दल दिली महत्त्वाची माहिती

  • ...तेव्हाच लसीकरणाला होणार सुरूवात!

  • कोविडचा 'सीएसआर'मध्ये समावेश

  • मृतदेहांची अंतिम यात्रा सन्मानानेच निघायला हवी...

महाराष्ट्रातील लॉकडाउनमध्ये १५ मे पर्यंत वाढ; राजेश टोपेंची माहिती
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात वाढणाऱ्या कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला लॉकडाउन हा १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकारी, सचिव आणि मंत्र्यांची व्हिडीओद्वारे बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाउन 15 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय झाला, असं त्यांनी सांगितलं. राज्यात १५ दिवसांचा लॉकडाउन वाढवण्यात आला असून नागरिकांनी साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

ऑक्सिजन, रेमडेसिवीरबद्दल दिली महत्त्वाची माहिती

"सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर प्रचंड काटकसरीने वापरणं महत्त्वाचं आहे. कोरोनाची तिसरी लाट ही जुलै आणि ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यावेळी ऑक्सिजन कमी आहे, हे कारण ऐकून घेतलं जाणार नाही असा स्पष्ट इशारा सर्व जिल्ह्याधिकांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. ज्या ठिकाणी शासनाची मोठी हॉस्पिटल नाहीत, त्या ठिकाणी टेली- ऑक्सिजनची व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत रेमडेसिवीर हे राज्याला गरजेपेक्षा कमी मिळत आहे. त्यामुळे त्याचा अतिरिक्त वापर केल्यास दुष्परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे त्याचाही वापर जपून केला जावा", असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

...तेव्हाच लसीकरणाला होणार सुरूवात!

"केंद्राने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केंद्रावर १ मे पासून मोहीम राबविण्यास सांगितलं आहे. पण लसीची कमतरता आहे. त्यामुळे आपलं नव्या वर्गाचे लसीकरण लांबणीवर पडलं आहे. ज्यावेळी एकत्रित लसी उपलब्ध होतील, त्यावेळी लसीकरणाला सुरुवात होईल."

कोविडचा 'सीएसआर'मध्ये समावेश

"केंद्र सरकारकडून कोविडचा समावेश 'सीएसआर'मध्ये समावेश करण्यात आला आहे. आमच्याकडून याबद्दलची सातत्याने मागणी केली जात होती. अखेर केंद्राने ही मागणी मान्य केली. त्यामुळे आता कंपन्या आपल्या दोन टक्क्यांतून कोव्हिडसंदर्भांतील उपाययोजना करू शकतील", असं टोपेंनी सांगितलं.

मृतदेहांची अंतिम यात्रा सन्मानानेच निघायला हवी...

गेल्या काही दिवसात कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. मृतदेहांचे प्रमाणेही वाढल्याचे दिसत असून मृतदेहांची अवहेलना होत आहे. याबाबतच्या घटनांची बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शववाहिनींची संख्या वाढवा अशी पालिकेला सूचना करण्यात आली आहे. अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणीसुद्धा इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून अंत्ययात्रा ही सन्मानानेच व्हायला हवी, अशा सूचना करण्यात आल्याचे असं टोपे यांनी सांगितलं.