esakal | मुंबईतल्या स्थितीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

chebur

मुंबईतल्या स्थितीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

Mumbai Rain live update : शहराला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. रात्रभर मुंबईत पाऊस सुरु होता. त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. रात्रभर पडलेल्या पावसाने मुंबईकरांची झोप उडवली असं म्हणता येईल. सकाळी चार वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता. सध्या पावसाने उसंत घेतली आहे. असे असले तरी धोका कायम आहे. पुढील काही तासांत पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचले असल्याने लोकांना घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय.

मुंबईत पावसामुळ बिघडलेल्या परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आढावा. यासाठी संध्याकाळी ६ वाजता उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं - वडेट्टीवार

विक्रोळीतील पंचशील चाळ या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहोचला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापनात मुंबई महापालिका पूर्णपणे अपयशी

आपत्ती व्यवस्थापनात मुंबई महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. लोकांचे जीव वाचवण्यात बीएमसीचा गोंधळ का झालाय? पालिकेला याचं उत्तर द्यावं लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेची याप्रकरणी चौकशी करावी अशी आम्ही मागणी करत आहोत, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

  • मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आलाय. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अशाप्रकारच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी इतरत्र राहण्याची सोय करण्यासाठी एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं ते म्हणाले.

  • मुंबईत भिंत कोसळून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुबियांना पंतप्रधान रिलिफ फंडमधून मदत जाहीर करण्यात आली आहे. मृत्यू पावलेल्यांच्या कुटुबियांना 2 लाख रुपये, जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन याची माहिती दिली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे पाणी ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळतंय. पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

  • भांडुपमध्ये वनविभागाची भिंत कोसळून एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भांडुपच्या अमरकोर शाळेजवळची ही घटना आहे. रात्रभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे दुर्घटना घडत आहेत.

  • मिठी नदी धोक्याच्या पातळीवर गेली आहे. नदीची धोक्याची पातळी 3.3 मीटरवर गेली आहे. नदी ओव्हरप्लो झाली असून पाण्याची पातळी 4.2 मीटर झाली आहे. यामुळे पालिकेने आजूबाजूच्या वस्त्या खाली करण्यास सुरुवात केली आहे. कुर्ला येथील क्रांती नगर वस्ती खाली केले जात आहे. सर्व कुटुंबाना पालिकेच्या शाळांमध्ये नेले जात आहे.

  • पावसामुळे मुंबईत दोन वेगवेगळ्या घटनेत 19 जणांचा मृत्यू झालाय. विक्रोळी येथे तीन तर चेंबूरमध्ये 14 जणांचा घराचा छत कोसळून मृत्यू झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

मुंबईत पडलेल्या पाऊसामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमंडलं आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना अडचणी येणार आहेत. मध्य आणि हार्बर मार्गावर अनेक स्थानकांवर रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. ठाणे /कल्याण, कर्जत/ खोपोली, कसारा सेक्शन, वाशी / पनवेल, ट्रान्स हार्बर लाइन, नेरूळ/बेलापूर, खारकोपर लाइन वरील गाड्या कार्यरत, तर एक्सप्रेस गाड्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. अजून पाण्याचा निचरा झालेला नाही, त्यामुळे रेल्वे गाड्या उशिराने सुटणार आहेत.

loading image