esakal | राज्याची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी 5 लाखांहून अधिक जणांना लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra record vaccinating

राज्याची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी 5 लाखांहून अधिक जणांना लसीकरण

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून सोमवारी सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. सोमवारच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. 3 एप्रिलला 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. सोमवारी राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे अभिनंदन केले आहे.

लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर

लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत 1 कोटी 43  लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात कालची संख्या मिळविली तर सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास ही संख्या होत असून आजच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे असून 26 एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 6155  लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये 5347 शासकीय आणि 808 खासगी केंद्रांचा समावेश आहे.  कोरोना प्रतिबंधात्मक  लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येनं लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी  सांगितले.

हेही वाचा: मुंबईत १८ वर्षापुढील लसीकरणात एक मोठं चॅलेंज

राज्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

maharashtra record vaccinating more than five lakh people in single day

loading image