ठाण्यात अतिवृष्टीच्या धास्तीत महासभा तहकूब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

मुंबईसह ठाणे परिसरात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर गुरुवारी होणारी ठाणे पालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. त्या आशयाचे पत्र तातडीने बुधवारी (ता. १८) सायंकाळी काढण्यात आले.

ठाणे : मुंबईसह ठाणे परिसरात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर गुरुवारी होणारी ठाणे पालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. त्या आशयाचे पत्र तातडीने बुधवारी (ता. १८) सायंकाळी काढण्यात आले. मात्र, गेले काही दिवस सत्ताधारी शिवसेनेपासून फारकत घेतलेल्या भाजपने ही महासभा प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवरील टीका टाळण्यासाठीच तहकूब करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

शहरातील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. परंतु, या समस्येकडे पाहण्यास प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला वेळ मिळत नाही. केवळ आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्‌घाटने करण्यात मग्न असलेल्या शिवसेना नेत्यांचे शहरातील खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अशावेळी पालिकेच्या महासभेत या खड्ड्यांबाबत प्रशासन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उत्तरे देण्याची वेळ येऊ नये, यासाठीच अतिवृष्टीच्या नावाखाली सभा रद्द केल्याचा आरोप भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी केला. 

पालिका प्रशासनाकडून गुरुवारी (ता. १९) महासभा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, या सभेत काही आयत्या वेळच्या विषयांवरून भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली होती. विशेष म्हणजे शहरातील खड्ड्यांबाबत आक्रमक झालेल्या भाजपच्या नारायण पवार यांनी खड्डे बुजविण्यात अपयशी ठरल्याबद्दल महापालिकेचे नगर अभियंता रवींद्र खडताळे यांना खड्ड्यांच्या छायाचित्राची फ्रेम उपरोधिकपणे बुधवारी भेट म्हणून दिली; तर स्थायी समितीच्या बैठकीतही रस्त्यावरील खड्डे हा संतापाचा विषय ठरला होता. त्यामुळे खड्ड्यांच्या विषयावरून भाजप महासभेत वादळ निर्माण करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन अधिकाऱ्यांमधील नव्याने सुरू झालेल्या संवादामुळेच ही सभा दोन्हीकडील संमतीनंतर रद्द करण्यात आल्याचे नारायण पवार यांनी सांगितले.

बारा तास आधी सभा तहकूब करण्यात आल्याने या तहकुबीबाबत संशय निर्माण झाला आहे. अतिवृष्टीच्या इशारा दिल्यानंतर आज अर्धा दिवस तर शहरात चक्क ऊन पडले होते. आचारसंहितेपूर्वी होणारी सभा शहराच्या विकासासाठी अत्यावश्‍यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने भविष्यात या साऱ्यांची उत्तरे पालिका आणि सत्ताधारी शिवसेनेला द्यावी लागणार आहेत.
- नारायण पवार, भाजप गटनेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahasabha Tahkub in fear of heavy rainfall in Thane