esakal | केंद्राकडून कोणताही निधी आला नाही, महाविकास आघाडीकडून फडणवीस यांचा भांडाफोड

बोलून बातमी शोधा

केंद्राकडून कोणताही निधी आला नाही, महाविकास आघाडीकडून फडणवीस यांचा भांडाफोड

कोरोनाचा सामना करण्यासाठी  केंद्र सरकारकडून कोणताही स्वतंत्र निधी आला नाही, अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याचा इन्कार केला

केंद्राकडून कोणताही निधी आला नाही, महाविकास आघाडीकडून फडणवीस यांचा भांडाफोड
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता 27 : कोरोनाचा सामना करण्यासाठी  केंद्र सरकारकडून कोणताही स्वतंत्र निधी आला नाही, अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याचा इन्कार केला. स्वतंत्र निधीची माहिती असेल तर त्यांनी तपशीलवार ती द्यावी, असे असे आव्हानही सरकारकडून यावेळी देण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्याला कशी मदत केली, याची माहिती देण्यासाठी काल पत्रकार परिषद घेतली. फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अनिल परब, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्याशिवाय जयंत पाटील यांनी आर्थिक तरतुदीचे बारकावे नमूद केले आणि बाळासाहेब थोरात यांनी आमचे सरकार योग्य उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी अभासी पत्रकार परिषद घेतली त्याला आम्ही उत्तर देतोय असे म्हणत अनिल परब यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार भरघोस मदत देऊनसुद्धा कोरोनाचा सामना करण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे. मात्र, लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती समोर मांडतोय, असे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले.

अनिल परब म्हणाले की, विरोधीपक्षाने उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्राकडून मदत आणून दिली असती, तर आम्ही अभिनंदन केले असते. फडणवीसांनी उणीधुणी काढण्यापेक्षा त्यांनी खरचं काही मदत केली असती. तर आम्ही त्यांचे कौतुक केले असते. फडणवीसांच्या दाव्याप्रमाणे 1750 कोटी रुपयांचा गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही. 122 कोटी स्थलांतरित मजुरांसाठी दिलेले नाहीत, कारण ऑर्डर चार दिवसापूर्वी निघाली आणि मजूर आधीच गावी पोहोचलेले आहेत.

विधवा, दिव्यांग आणि इतरांना 116 कोटी दिले असा दावा फडणवीसांनी केला. पण या योजनेत फक्त 20 टक्के रक्कम केंद्र सरकार देते. महाराष्ट्र सरकारने उर्वरित 80 टक्के म्हणजे 1210 कोटी दिले, हे त्यांनी सोयीस्करपणे सांगितले नाही. महाराष्ट्रातून 600 श्रमिक ट्रेन सुटल्या. या सर्व ट्रेनचा खर्च महाराष्ट्र सरकारने दिला आहे. कोणत्याही श्रमिकाकडून पैसे घेतलेले नाही. श्रमिकांना ट्रेनने सोडण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकारने केला. मजुरांकडून एकही पैसा घेतला नाही. तसेच एका ट्रेनला 50 लाख खर्च कुठून येतो, याचा हिशोब विरोधीपक्षकडून घ्या, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.

वेळेवर रेल्वे मिळाली नाही म्हणून एसटी आणि बेस्टच्या वतीने आम्ही मजूरांना इच्छित ठिकाणी पोहोचवत होतो. महाराष्ट्रापेक्षा लहान गुजरात राज्याला जास्त ट्रेन दिल्या आणि उलट राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अनिल परब यांनी केला.  महाराष्ट्र सरकारचे हक्काचे 18 हजार कोटी जीएसटीचे 2019-20 चे पैसे आम्हाला मिळालेले नाही. हक्काचे पैसे जरी मिळाले तरी पुरेसे आहेत आम्हाला, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.

कापूस, धान, चणा-मका अशा शेतमाल खरेदीसाठी 9 हजार कोटी दिल्याचा फडणवीस यांचा दावा खोटा आहे. महात्मा फुले योजनेअंतर्गत आम्ही 12 हजार कोटी वाटले. मजुरांच्या छावण्यांसाठी 1611 कोटी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले, परंतु, दरवर्षी 4600 कोटी रुपये आपत्ती व्यवस्थापनाचे मिळतात, हे त्यातलेच पैसे असून वेगळे दिलेले नाहीत, अशीही अनिल परब यांनी दिली.

EPFO चे पैसे अद्याप आलेले नाहीत. केंद्राकडून 2 लाख 71 हजार 500 कोटी महाराष्ट्राला मिळणार असे फडणवीस यांनी सांगितले, पण हे आभासी आहे, प्रत्यक्ष किती मिळणार याचा आमचाही अभ्यास आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले :-

  • कुठल्याही राज्याच्या तुलनेत मुंबई आणि महाराष्ट्रात कोविडच्या बाबतीत अधिक सुविधा, मुंबईत लोकसंख्येची घनता अधिक असतानाही रुग्णसंख्या आटोक्यात 
  • आम्ही कर्ज काढू, पण कर्ज द्यायचं तर खुल्या दिल्याने द्या, अटीशर्थी घालू नका 
  • 49 लाख मास्क मागितले, पण 13 लाख 13 हजार 300 च आले, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर 21 मेच्या आकड्यानुसार शून्य मिळाले 
  • पंतप्रधान निधीला पैसे द्या, पण मुख्यमंत्री निधीला देऊ नका, असे आवाहन फडणवीस यांनी केले, भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र, हा प्रश्न पडतो 
  • IFSC गुजरातला नेण्याचे समर्थन देवेंद्र फडणवीस यांनी केले हे दुर्दैवी 
  • महाराष्ट्रातील युवकांकडे आवश्यक ती सर्व कौशल्य, फडणवीस यांनी त्यांना कमी लेखू नये, जे मजूर गेले ते परत येतील, पण मोदींनी राबवलेला ‘स्कील इंडिया’ महाराष्ट्रात फेल गेला का, असे वाटते
  • आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाठीशी उभे असल्याचे फडणवीस सांगतील, असे वाटले, मात्र त्यांनी महाराष्ट्र बचाव आंदोलन करुन आमच्या आणि यंत्रणेच्या प्रयत्नांवर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला
  • रुग्ण दुपटीचा वेग मंदावला, महाराष्ट्रात मृत्यूदर 3.26 टक्क्यावर आहे, ही स्पर्धा नाही, पण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात दर नियंत्रणात. मुंबईत 10 हजार अतिरिक्त बेड्स आहेत 
  • मे महिनाअखेर राज्यात दीड लाख कोरोना केस होतील असा केंद्र आणि WHO चा अंदाज होता, मात्र फार तर 60 हजार पर्यंत जातील असा आमच्या टास्क फोर्सचा अंदाज, मुंबई-पुण्यासह राज्यात डेथ ऑडीट करणारी टीम आहे, सध्याच्या घडीला फक्त 35 हजार 178 पॉझिटिव्ह आहेत
  • महाराष्ट्र आणि मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेल्याच्या बातम्या सोडल्या जात आहेत, मात्र देशात सर्वात चांगले काम मुंबईत झाले आहे.

mahavikas aaghadi holds joint press conference to revert on the points made by fadanavis