esakal | नवी मुंबई शहरातून 'का' होतायत मोलकरणी गायब ?  
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबई शहरातून 'का' होतायत मोलकरणी गायब ?   

शहरातून झाल्या 'आऊट ऑफ रेंज' 

नवी मुंबई शहरातून 'का' होतायत मोलकरणी गायब ?  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) कायद्याच्या धाकाने शहरातील मोलकरणी 'आऊट ऑफ रेंज' झाल्याचे पाहायला मिळत आहे. अचानकपणे या मोलकरणींनी घेतलेल्या सुट्ट्यांमुळे घरकाम आवरताना व सोबतच नवी मोलकरीण शोधताना गृहीणींच्या नाकी नऊ येत आहे. 

नवी मुंबईतील दिघा, रबाळे, तुर्भे, शिरवणे, घणसोली, वाशी, करावे येथे मोठ्या प्रमाणावर पूर्व भारतातून आलेले अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये अनेक जण मूळचे बांगलादेशी असल्याचे सांगण्यात येते. या महिला मात्र आपण आसाम, पश्‍चिम बंगाल, ओरिसा येथील राहणाऱ्या असल्याचे सांगतात.

यापैकी बऱ्याच महिला उदरनिर्वाहासाठी घरकाम करतात; तर काही लहान मुलांना सांभाळण्याचे कामही करतात. इतर मोलकरणींच्या (महिना 800 रुपये) तुलनेत या महिला कमी (महिना 600 ते 700 रुपये) पगार घेत असल्याने अनेक घरांमध्ये सहज काम मिळते. तसेच अधिक भाडे मोजण्यास तयार असल्याने शहरातील गावठाण भागात त्यांची निवाऱ्याची सोयदेखील होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) कायद्यामुळे आपलीही धरपकड होईल, काही आपत्ती ओढवेल, या भीतीच्या सावटाखाली या महिला असल्याचे काही गृहिणींनी सांगितले. 

महत्त्वाची बातमी : बापाने वाजवला पोराचा गेम, कारण ऐकाल तर सुन्न व्हाल..

सीवूडस एनआरआय कॉम्प्लेक्‍समधील एका गृहिणीने सांगितले की, खरे तर हा कायदा येण्यापूर्वीच गेले कित्येक दिवस माझ्या मोलकरणीला गावाहून सारखा फोन येत होता. 'आधार कार्ड बनवणे गरजेचे आहे, कागदपत्रे जमा करायची आहेत. लवकर गावी निघून ये. ' गावी जायचे झाले तर महिनाभर तरी परत येणे शक्‍य नसल्याने ती गावी जाण्याचे टाळत होती.

आता अचानक तिचा फोन बंद येत आहे. शुक्रवारपासून ती कामाला आलेली नाही. बऱ्याचदा मोलकरणी जास्त प्रवास टाळता यावा याकरिता एकाच इमारतीत किंवा आजूबाजूच्या चार-पाच इमारतीत काम पाहतात. एका गृहिणीने सांगितले, की कामाला ठेवताना गावाची विचारपूस केल्यावर या महिला आपण बंगालच्या असल्याचे सांगतात. माझ्याकडे येणारी महिला पाच वर्षे इथे राहतेय. कामाच्या बाबतीत कसलीच तक्रार नसल्याने व कमी पगारात चांगले काम होत असल्याने दुसरी बदललीही नाही. मात्र, रविवारी 'गावी जातेय, वापस आयी तो मुझेही काम पे रखना' असे सांगून ती गेली. 

महत्त्वाची बातमी :  ...म्हणुन त्या महिलेने स्वत:ची ओढणी जखमी तरूणीकडे फेकली


बंगालची आहे. लहानाची मोठी तिथेच झाले. तिथे आमचे घर आहे. आम्ही पै पै जमवून घर उभे केले. पण आमच्याकडे आधार कार्ड नाही. इतर कुठली कागदपत्रं नाहीत. इथे गेली पंधरा वर्षे राहतेय; पण कधी कसली भीती वाटली नाही. आता दडपण आलंय. गावी जाऊन अगोदर कागदपत्रं तयार करावी लागतील. नाहीतर बेघर व्हावे लागेल.

- झरना, मोलकरीण 

सध्या वातावरण खूपच वाईट आहे. नव्या कायद्यामुळे स्थलांतरित महिलांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्या मोठ्या संख्येने नाही म्हणता येणार; पण हळूहळू आपल्या गावी परतू लागल्या आहेत. सर्वच बांगलादेशी नाहीत; काही पश्‍चिम बंगालमधीलही आहेत. आपण त्यांना आश्‍वस्त करणे गरजेचे आहे. ही गोष्ट फक्त घरकामगारांची नाही; तर इतर क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच स्थलांतरितांना या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे. 

- नीला लिमये, सरचिटणीस, महाराष्ट्र महिला परिषद.  

maids in Navi Mumbai are terrified due to fear of NRC and CAA


 

loading image
go to top