केडीएमटीची मुख्य इमारत धोकादायक 

रवींद्र खरात
गुरुवार, 9 जानेवारी 2020

कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या समोरच परिवहन उपक्रमाचे (केडीएमटी) मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्याने तेथील विविध कार्यालये स्थलांतरित करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी 15 दिवसांत ती धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे. 

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या समोरच परिवहन उपक्रमाचे (केडीएमटी) मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्याने तेथील विविध कार्यालये स्थलांतरित करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी 15 दिवसांत ती धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे. 

कल्याण पश्‍चिमेकडील शंकरराव चौकात पालिका मुख्यालय इमारत असून त्याच्या समोर केडीएमटीचे एक मजली मुख्य कार्यालय आहे. या इमारतीचे उद्‌घाटन 23 जुलै 1997 ला तत्कालीन महापौर रमेश दळवी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या एक मजली इमारतीमध्ये केडीएमटी व्यवस्थापक, परिवहन समिती सभापती कार्यालय असून, व्यवस्थापक आणि त्यांचे प्रशासकीय कामकाज करणाऱ्या विभागातील अधिकारी-कर्मचारी तेथे बसतात.

तळमजल्यावरील दुकाने पालिकेने भाडेतत्त्वाने दिली आहेत. तीन वर्षांपूर्वी संबंधित इमारत धोकादायक झाल्याने पर्यायी जागा देण्याची मागणी केडीएमटी प्रशासनाने पालिकेकडे केली. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने धोकादायक इमारतीमध्ये केडीएमटीचे प्रशासकीय कामकाज सुरू होते. 

त्यातच या इमारतीचा काही भाग कोसळल्याने 30 मे 2019 ला "क' प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांच्या पथकाने इमारतीमधील धोकादायक भाग तोडला होता. मात्र पुन्हा त्या इमारतीचा काही भाग कोसळण्यास सुरुवात झाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून "क' प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी सूचनावजा नोटीस बजावत त्वरित कार्यालय स्थलांतर करा, असे कळविले आहे. 

दरम्यान, केडीएमटीच्या मुख्य इमारतीमागे एक खासगी विकासकाच्या टोलेजंग इमारतीचे काम सुरू आहे. त्या इमारतीला केडीएमटीची ही इमारत अडथळा होत असल्याने धोकादायक ठरवून ती हटविण्याचा घाट सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. 

केडीएमटी मुख्यालय इमारत धोकादायक झाल्याने तेथील कार्यालय स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पर्यायी जागेबाबत चर्चा सुरू असून, लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल. 
- मारुती खोडके, 
केडीएमटी महाव्यवस्थापक. 

केडीएमटी मुख्य कार्यालयाची इमारत धोकादायक झाली असून त्यांना पर्यायी जागा देण्यात आली आहे. आगामी 15 दिवसांत ती इमारत तोडण्यात येईल. 
- भारत पवार, 
"क' प्रभाग क्षेत्र अधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The main building of KDMT is dangerous