
भारतीय वृत्तपत्रांचं स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोठं योगदान : मोदी
मुंबई : नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, दुपारी देहुतील शिळा मंदिराचे लोकार्पण करून मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई समाचारने स्वातंत्र्याच्या आंदोलनाला आवाज दिला असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. 200 वर्षांपासून वृत्तपत्र सुरू असणं आश्चर्यच असून, हे वृत्तपत्र आजही सामान्यांचं वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र भारताचं अभिव्यक्ती असून, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेलसुद्धा मुंबई समाचार या वृत्तपत्राचा दाखला द्यायचे असे मोदी म्हणाले. ते मुंबईतील बीकेसी येथे आयोजित मुंबई समाचारच्या 200 व्या वर्षपूर्ती सोहळ्यात बोलत होते. (PM Modi BKC Program News)
हेही वाचा: 'मराठी आणि गुजरातीचं नातं आणखी दृढ व्हावं': उद्धव ठाकरे
मोदी म्हणाले की, परकीयांच्या प्रभावाखाली हे शहर बॉम्बे झाले, तेव्हाही या वृत्तपत्राने आपला स्थानिक संपर्क सोडला नाही, मुळाशी असलेला संबंध तोडला नाही. तेव्हाही ते सामान्य मुंबईकराचे वर्तमानपत्र होते आणि आजही तसेच आहे. दोन शतकांमध्ये अनेक पिढ्यांचे आयुष्य, त्यांच्या चिंता मुंबई समाचारने मांडल्याचेही यावेळी मोदी म्हणाले. मुंबई समाचारनेही स्वातंत्र्य चळवळीला आवाज दिला आणि त्यानंतर स्वतंत्र भारताची 75 वर्षे सर्व वयोगटातील वाचकांपर्यंत पोहोचवली. भाषेचे माध्यम गुजराती नक्कीच होते, पण चिंता राष्ट्रीय होती असे मोदी म्हणाले. प्रसारमाध्यमांना टीका करण्याचा जितका अधिकार आहे, तितकीच जबाबदारी सकारात्मक बातम्या समोर आणण्याचीही आहे.
हेही वाचा: भारतीय स्वातंत्र्य लढ्यानं अनेक देशांनां प्रेरणा दिली - PM मोदी
मुंबई समाचार हे केवळ बातम्यांचे माध्यम नाही, तर वारसा आहे. मुंबई समाचार हे भारताचे तत्वज्ञान आहे, भारताची अभिव्यक्ती आहे. प्रत्येक वादळानंतरही भारत कसा खंबीरपणे उभा राहिला आहे, याची झलकही आम्हाला मुंबई समाचारमधून मिळते. भारताचा हजारो वर्षांचा इतिहास आपल्याला खूप काही शिकवून जातो. इथे कोणीही आले, लहान असो वा मोठे, दुर्बल असो वा बलवान, माँ भारतीने सर्वांना आपल्या कुशीत भरभराटीची संधी दिली आहे. पारशी समाजाचे यापेक्षा चांगले उदाहरण काय असू शकते?
स्वातंत्र्य चळवळीपासून ते भारताच्या नवनिर्माणापर्यंत पारशी भगिनी आणि बांधवांचे योगदान मोठे असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. हा समुदाय संख्येनुसार देशातील सर्वात लहान आहे, एक प्रकारचा सूक्ष्म-अल्पसंख्याक आहे, परंतु सामर्थ्य आणि सेवेच्या बाबतीत खूप मोठा आहे.
Web Title: Major Contribution Of Indian Newspapers In Freedom Movement Says Pm Modi In Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..