कालिना कॅम्पसचे नामकरण 'अण्णाभाऊ साठे विद्यानगरी' करा; वाचा कोणी केली 'ही' मागणी

कालिना कॅम्पसचे नामकरण 'अण्णाभाऊ साठे विद्यानगरी' करा; वाचा कोणी केली 'ही' मागणी


मुंबई : साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीची सांगता शनिवारी (1 ऑगस्ट ) होत आहे. या दिनाचे औचित्य साधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सांताक्रूझ येथील मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसचे नाव साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी असे करावे, अशी मागणी आंबेडकरी लोक संग्रामने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हे सूत्र आपल्या वाणीच्या व लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत रुजवणाऱ्या अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा आवाज बुलंद केला होता. प्रस्थापित व्यवस्थेने मागास ठरवलेली जात अण्णाभाऊंच्या वाट्याला आली. या जात व्यवस्थेचे चटके त्यांच्या कैक पिढ्यांनी वाटेगावपासून अनुभवले. झोपडपट्टीतले किड्यामुंग्यांचे जगणे पाठीवर घेऊन गुदमरलेला श्वास कसा मुक्त करता येईल यासाठी अण्णाभाऊंनी अखेरपर्यंत आपली लेखणी झिजवली. त्यांच्या फकीरा या एकाच कांदबरीने साहित्यविश्वाला अक्षरशः जिंकले आहे. आज ती कांदबरी अजरामर ठरली आहे. जगभरात अण्णाभाऊंचा जन्म शताब्दी सोहळा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांचा गौरव म्हणून मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसचे नाव अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा, अशी मागणी आंबेडकरी लोक संग्राम संघटनेने प्रा. डॉ जो के डोंगरगावकर, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ आणि अच्युत भोईटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या एका निवेदनात केली आहे.

अण्णाभाऊ साठे यांना वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत अक्षरांची ओळख नव्हती. केवळ दीड दिवसांची शाळा अण्णाभाऊंनी पाहिली. तरीही अफाट आणि अन् अचाट शब्दसामर्थ्याने उपेक्षित, वंचित, गरीब, कष्टकरी अशा सर्वहारा समुहाच्या वेदनेचा ठाव त्यांनी घेतला. हतबल जगणं, दुःख्ख आणि गलितगात्र परिस्थितीचा हुंकार बनून त्यांची लेखणी आग ओकत राहिली. तिने प्रस्थापित साहित्याला जबरदस्त हादरे दिले, याची आठवण संघटनेने सरकारला निवेदनाद्वारे करून दिली आहे.

--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com