esakal | New Year 2021 | मॉल-सुवर्णपेढ्या उजळल्या; पण बाजार फिकाच! नववर्ष स्वागताच्या उत्साहावर कोरोनामुळे विरजण
sakal

बोलून बातमी शोधा

New Year 2021 | मॉल-सुवर्णपेढ्या उजळल्या; पण बाजार फिकाच! नववर्ष स्वागताच्या उत्साहावर कोरोनामुळे विरजण

दिवाळीनंतर वर्षअखेरपर्यंत बाजारपेठेचा मूड पुन्हा पालटला असून मोठ्या मॉलमध्ये आणि सोने-चांदीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत असली तरी इतर बाजारातील खरेदी मंदावल्याचे चित्र आहे.

New Year 2021 | मॉल-सुवर्णपेढ्या उजळल्या; पण बाजार फिकाच! नववर्ष स्वागताच्या उत्साहावर कोरोनामुळे विरजण

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई  ः दिवाळीनंतर वर्षअखेरपर्यंत बाजारपेठेचा मूड पुन्हा पालटला असून मोठ्या मॉलमध्ये आणि सोने-चांदीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत असली तरी इतर बाजारातील खरेदी मंदावल्याचे चित्र आहे. दुकानांमध्ये नववर्षाचा काहीच उत्साह नसल्याने व्यवसाय थंडच असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. मॉलमधील चित्रपटगृहेही ओस पडल्याचे चित्र आहे. 
दसरा-दिवाळी सणासुदीचा मोसम बरा गेला; पण नंतर पुन्हा व्यवसाय थंडावले. त्यातच कोरोनाबाबतच्या उलटसुलट निर्बंधांच्या बातम्यांनी पुन्हा ग्राहकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे, असा अनुभव दुकानदारांना येत आहे. काही दिवस वीकेंड चांगले जातात; पण नंतर पुन्हा रात्रीची संचारबंदी, इंग्लंडमधील नवीन विषाणू आदी बातम्या येतात व सारे वातावरण फिरते, असा सापशिडीचा खेळ सुरू असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

सोनेखरेदीचा उत्साह 
सध्या लग्नसराई सुरू झाल्याने दसरा-दिवाळीपासून आतापर्यंतचा हंगाम चांगला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ नाही; पण एप्रिल ते जूनच्या तुलनेत खूपच उत्साहवर्धक स्थिती आहे, असे पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर म्हणाले. मागचे राहिलेले विवाह आता होत आहेत. समारंभातील खर्च कमी झाल्याने तो पैसा दागिन्यांसाठी वापरला जात आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणले. किमत वाढूनही सोन्याचे आकर्षण भारतीयांमध्ये आहेच. त्यातच समारंभात हजर राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर निर्बंध आल्याने विवाह सोहळ्याच्या खर्चात चांगलीच बचत झाली आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून आणि सोन्याची खरेदी विश्‍वासार्ह असल्याने अनेकांचा दागिने घेण्याकडे कल आहे, असेही पेडणेकर म्हणाले. 

मॉल सावरले 
दिवाळी चांगली गेल्यानंतर पुन्हा काही आठवडे मंदी आली होती; पण आता डिसेंबरअखेर पुन्हा व्यवसायाने जोर पकडला आहे. खरेदीसाठी अनेक जण येत आहेत; परंतु मॉलमधील चित्रपटगृहे अजूनही ओस पडली आहेत, असे कांदिवलीच्या ग्रोव्हेल्स मॉलचे सचिन धनावडे यांनी सांगितले. 
दिवाळीत 90 टक्के व्यवसाय झाला. नंतर पुन्हा सारे थंड झाले. जानेवारीतील खरेदीवरील सवलत लवकर जाहीर केल्याने 25 डिसेंबरपासून पुन्हा व्यवसायाने जोर धरला आहे. सव्वा लाखाचे महागडे मोबाईलही विकले जात आहेत. मध्यमवर्गीयांची गर्दी होत आहे. सुट्टीमुळेही गर्दी वाढली; पण चित्रपटगृहांमध्ये जेमतेम तीन ते चार टक्केच प्रेक्षक येत आहेत. पूर्वी लोक मॉलमध्ये हॉटेलिंग, चित्रपट आणि खरेदीसाठी तीन ते चार तास घालवायचे. आता कोणी सहकुटुंब येत नाही. मोजकेच जण येऊन खरेदी करून अर्ध्या-पाऊण तासातच जातात, असेही धनावडे यांनी दाखवून दिले. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भेटीगाठी घटल्याने निरुत्साह 
एरवी नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण मुंबईत येतात. नातलगांच्या-मित्रांच्या भेटीगाठी घेतात; मात्र रात्रीची संचारबंदी असल्याने मुंबईकरच शहराबाहेर गेले आहेत. त्यामुळे दुकानांमध्येही गर्दी नाही, असे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष व रूपम शॉपचे वीरेन शहा म्हणाले. सर्व काही सुरळीत झाल्यासारखे दिसते आहे. रस्त्यावर वाहनांची आणि पादचाऱ्यांची गर्दी आहे; पण अजूनही कोणी फारसा खर्च करीत नाही, अशी परिस्थिती आहे. पैसा साठवून ठेवण्याकडे त्यांचा कल आहे असे शहा म्हणाले. दसरा-दिवाळीचा मोसम बऱ्यापैकी गेला; पण नववर्ष स्वागताचा काही उत्साहच दिसत नाही. निर्बंधांमुळे व्यवसायच होत नाही. त्यातच विवाह सोहळ्यांमधील उपस्थितीवरही निर्बंध असल्याने खरेदी कमी झाली आहे, असेही ते म्हणाले. 
दुकानांमध्ये अजूनही खरेदीदार येत नाहीत. अनेक जण पैसे खर्च करण्यास तयार नाहीत, असे मोबाईलच्या भागांचे होलसेल व्यापारी अस्लम मलकानी यांनी सांगितले. दिवाळीचा हंगामही चांगला गेला नाही. सध्या महागाईही वाढते आहे. खाद्यतेल-डाळी आदी जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढतच आहेत. त्यामुळे सामान्य जन मोबाईल कव्हर घेण्यापेक्षा अन्नधान्यावर खर्च करणेच पसंत करतो, असेही त्यांनी दाखवून दिले. 

Mall gold banks lit up But the market fades! Corona loses on New Years Eve excitement

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image