मांडवा ते मुंबई जलप्रवास झोकात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - आरामदायी अन्‌ पर्यावरणपूरक प्रवास म्हणून मुंबईकर जलप्रवासाला पसंती देत आहेत. साहजिकच मांडवा ते मुंबई प्रवास बोटीने करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी तब्बल १४ लाख ३२ हजार १७० प्रवाशांनी मांडवा ते मुंबई प्रवास बोटीतून केला.

मुंबई - आरामदायी अन्‌ पर्यावरणपूरक प्रवास म्हणून मुंबईकर जलप्रवासाला पसंती देत आहेत. साहजिकच मांडवा ते मुंबई प्रवास बोटीने करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी तब्बल १४ लाख ३२ हजार १७० प्रवाशांनी मांडवा ते मुंबई प्रवास बोटीतून केला.

शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर हैराण झाला आहे. वाहतुकीवरचा वाढता ताण लक्षात घेता त्यांची जलमार्गाला पसंती मिळत आहे. मांडवा आणि गेट वे ऑफ इंडिया परिसरात सध्या वर्षातील आठ महिने जलमार्गाने प्रवासी वाहतूक सुरू असते. रायगड औद्योगिक जिल्हा आहे. त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा जिल्हा आहे. अलिबागचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाला असल्याने मुंबईहून तिथे जाण्यासाठी जलप्रवासाचा सोपा मार्ग पर्यटकांना खुणावतो. अनेक जण छोटी सुटी मिळताच रायगड जिल्ह्याची पर्यटनवारी करतात. 

वर्षाला सुमारे १४ लाख प्रवासी मुंबई ते अलिबाग आणि अलिबाग ते मुंबई असा प्रवास करत असतात. मुंबई वा ठाणे परिसरातून अलिबाग, नागाव, मुरुड-जंजिरा आदी ठिकाणी रस्त्याने जाण्यासाठी पर्यटकांना सुमारे १०० ते १५० किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. त्यासाठी जवळपास तीन ते चार तासांचा वेळ लागतो. 

त्याउलट जलमार्गाने अलिबागला त्वरित पोहोचता येते. त्यामुळेच सातत्याने मांडवा ते मुंबई जलमार्गावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. वेळही कमी लागत असल्याने अन्‌ खर्चही आटोक्‍यात असल्याने बोटीचे पर्यटक वाढू लागले आहेत.

मांडवा ते मुंबईचे पर्यटक
२०१५-१६ - १३ लाख ९८ हजार १७७ 
२०१६-१७ - १३ लाख ६४ हजार १७६ 
२०१७-१८ - १४ लाख ३२ हजार १७०
(महाराष्ट्र सागरी मंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार)

Web Title: mandava to mumbai sea journey