Vidhan Sabha 2019 : 'वेक अप महाराष्ट्र'ची हाक देत युवक काँग्रेसचा जाहिरनामा!

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

- सर्व शैक्षणिक कर्ज माफ करणार 
- शेतकर्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्जाची हमी सरकार घेणार 
- सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा पाच हजार भत्ता 
- 1,91000 रिक्त जागा 180 दिवसांत पुर्ण करणार 
- खासगी नोकऱ्यांमधे स्थानिकांना 80 टक्के आरक्षण 

मुंबई : ‘महाराष्ट्राला जागं केलं नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. यामुळेच ‘वेक अप महाराष्ट्रा’ अशी संकल्पना घेवून देशात पहिल्यांदाच युवकांचा स्वतंत्र जाहिरनामा केला आहे. अशी माहिती देत युवक काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज हा जाहिरनामा प्रकाशित केला. 

राज्यातील लाखो युवकांमधे जावून विविध कार्यक्रम राबवून त्यांच्या सूचना व संकल्पना समजावून घेत हा जाहिरनामा तयार करण्यात आल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधे आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते. 
युवकांच्या जाहिरनाम्या मधे, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत शिक्षणासाठी घेतलेली सर्व शैक्षणिक कर्ज माफ करण्याची ग्वाही दिली आहे. 

याशिवाय, प्रमुख शहरात खासगी वसतीगृहाची संख्या वाढवणे, सर्व दिंव्यांग युवकांसाठी विनामूल्य उच्च शिक्षण, शेतकर्याच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्जाची हमी सरकार देणार असे आश्वासन युवकांच्या जाहिरनाम्यात दिले आहे. 

बेरोजगारांना दरमहा पाच हजार रूपये बेरोजगार भत्ता दोन वर्षासाठी दिला जाईल अशी महत्वकांक्षी घोषणा या जाहिरनाम्यात केली आहे. त्याशिवाय, युवक कल्याण ची प्रत्येक तालूका स्तरावर स्वतंत्र यंत्रणा व सरकार मधे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात येईल असे तांबे यांनी यावेळी जाहिर केले. 
अमंली पदार्थ सेवनावर बंदी घालण्यासाठी कठोर कारवाई व गडकिल्ल्यांच्या खासगीकरणाला कठोर विरोध करून सरकारच्या यंत्रणेखालीच आंतरराष्ट्रीय दर्जाचा पर्यटन विकास करण्यावर भर दिला जाईल असे सत्यजित तांबे यांनी यावेळी जाहिर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manifesto of Youth Congress for Maharashtra assembly elections