esakal | मनसुख हिरेन प्रकरणात WhatsApp कॉल ठरला महत्त्वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Mansukh-Hiren-Whatsapp-Call

रात्रीच्या वेळी फोन आला तेव्हा मनसुख घरातच होता, त्यामुळे...

मनसुख हिरेन प्रकरणात WhatsApp कॉल ठरला महत्त्वाचा

sakal_logo
By
Team eSakal

मुंबई: मनसुख हिरेनच्या मोबाईलवर आलेल्या तीन WhatsApp कॉलमुळे या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात तपास यंत्रणेला यश आले आहे. त्यामार्फत पोलिस बुकी नरेश गोर, विनायक शिंदे व सचिन वाझेपर्यंत पोलीस पोहोचू शकले. हत्येपूर्वी मनसुख हिरेनला घरी दूरध्वनी आला होता. त्यावेळी त्याचा फोन घरी असल्यामुळे घरातील वायफायला कनेक्टेड होता. त्यातील डेटाची पडताळणी केली असता तीन क्रमांक गुजरातमधील असल्याचे निष्पन्न झाले. या क्रमांकांच्या माध्यमातून दहशतवाद विरोधी पथक प्रथम बुकी नरेश गोरपर्यंत पोहोचले. त्याच्या चौकशीत विनायक शिंदे व सचिन वाझे यांची नावे पुढे आली. त्यातील एक दूरध्वनीचे एक लोकेशन अंधेरीतील चकाला परिसरातील होते. त्यामुळे एनआयएने अंधेरी परिसरातही शोध मोहिम राबवली होती.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या एनआयए करत आहे. त्यासाठी सोमवारी सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 4 आणि 5 वर सचिन वाझे यांना नेऊन 4 मार्चच्या रात्री काय घडले होते, याची नेमकी माहिती ‘एनआयए’च्या अधिका-यांकडून घेण्यात आली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साचिन वाझे यांनी 4 मार्च रोजी सीएसएमटी ते कळवा हा प्रवास लोकल ट्रेनने केला होता. त्यामुळे सोमवारी वाझे यांना कळव्यालाही नेण्यात आल्याचे समजते आहे. सीसीटीव्हीमध्ये मिळालेले फुटेज हे सचिन वाझे याचे चाालणे, फिरणे याच्याशी जुळत असल्याचे समोर आले आहे.

या माध्यमातून एनआयए अंबानी स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याकरता सचिन वाझे यांना प्रत्येक स्पॉटवर नेण्यात येत आहे. यावेळी एनआयए टीमसोबत पुण्याच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची टीमही हजर होती. या पथकाने काही ठिकाणचे नमुने गोळा केले आहेत. तसेच एनआयएने वाझेची स्पोर्ट्सबाईक जप्त केली असून याचेदेखील नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने घेतले आहेत. दरम्यान, एनआयएचे एक पथक दमणला रवाना झाले असून याठिकाणी कसून चौकशी तसेच झाडाझाडती सुरु आहे.

उपायुक्ताची चौकशी

अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) मंगळवारी उपायुक्त दर्जाच्या अधिका-याची चौकशी केली. सचिन वाझे यांच्यासोबत योगायोगाने झालेल्या भेटी संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, या अधिकाऱ्याचा गुन्ह्यात सहभाग नसून केवळ माहिती घेण्यासाठी बोलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सचिन वाझे याच्या अटकेनंतर एनआयएने अंबानी यांच्या घराशेजारी सापडेल्या स्फोटकांप्रकरणाचा घटनाक्रम जाणून त्याबाबत पुरावे गोळा केले आहेत. त्यानंतर आता मनसुख हिरेन याच्या हत्येचा पूर्ण घटनाक्रम एनआयए जाणून घेत आहेत. त्यासाठी एका उपायुक्त दर्जाच्या अधिका-याची मंगळवारी चौकशी करण्यात आली. वाझे व या अधिका-याची पोलिस आयुक्तालयात 3 मार्चला भेट झाली होती. त्याबाबतची माहिती एनआयएने घेतली.

(संपादन - विराज भागवत)

loading image