Mumbai : फराळ खाल्ल्यामुळे अनेकांना पोटदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी फराळ

फराळ खाल्ल्यामुळे अनेकांना पोटदुखी

मुंबई :  लॉकडाऊननंतर दोन वर्षांनी यंदाची ही दिवाळी प्रत्येकासाठीच खास होती. या दिवाळीत फटाक्याच्या आतषबाजीसह अनेकांनी भरपूर फराळ खाऊन हा सण साजरा केला. आता दिवाळी सरली असली, तरी फराळाची रुचकरता अजूनही कायम आहे; पण अतिजास्त प्रमाणात फराळ खाल्ल्याने अनेकांना सध्या अॅसिडिटीची समस्या उद्भवू लागली आहे. दररोज रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात पोटदुखीची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

भरपूर तेलकट, अरबटचरबट खाल्ल्याने अनेकांना ऐन दिवाळीत अॅसिडिटी किंवा पोट खराब होऊ लागले आहेत. अनेक लोक सध्या अपचन, बद्धकोष्ठता, छातीत जळजळ होणे, पोटदुखी अशा समस्या घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळे दिवाळीचा फराळ हा पचण्यात जड जात असल्याने अनेकांना त्रास जाणवू शकतो. परिणामी दिवाळीनंतर काहीच दिवसांत अपचन, आम्लपित्त, पोटदुखी, आंव पडणे, मलावरोध, मूळव्याध-फिशर्ससारखे गुदविकार, सर्दी-खोकला-दमा यांसारखे श्वसनविकार, रक्तातली साखर वाढणे वगैरे विकार बळावल्याचे दिसते. यामागे अयोग्य आहार हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे.

अशा स्थितीत बॉडी डिटॉक्स करण्याची आवश्यकता आहे. यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर एक ग्लास लिंबू पाणी प्या. याशिवाय नियमित आहारात भरपूर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासह काकडी, गाजर, फळे, डाळी, शेंगा आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात. जेणेकरून सणांचे दिवस संपल्यानंतर पचनक्रियेवर ताण येणार नाही. दिवसभरात भरपूर पाण्याचे सेवन करा. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातील. हायड्रेटेड राहिल्याने पचनक्रियाही सुधारते, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

आहाराकडे लक्ष द्या!

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. केयूर शेठ म्हणाले की, सणासुदीच्या काळात हाय कॅलरी, सॅच्युरेटेड फॅट आणि रिफाइंड शुगर वापरून तयार केलेला फराळ खाल्याने तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी सणाच्या कालावधीत आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

loading image
go to top