...अन्यथा ६० वा मराठा क्रांती मोर्चा रायगडमधून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

कोपर्डीच्या घटनेनंतर सारे राज्य ढवळून निघाले; मात्र अजूनही या आरोपींना शिक्षा झाली नाही. अशा स्थितीत रोहा तालुक्‍यातील तांबडी येथेही अशीच घटना घडली. 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून केला. ही बातमी दुर्लक्षित ठेवण्याची धडपड झाली.

मुंबईः रायगड जिल्ह्यातील तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याप्रकरणी 24 सप्टेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल झाले नाही, तर 26 सप्टेंबरला 60 वा मराठा क्रांती मोर्चा तांबडी गावात निघेल, अशी माहिती मोर्चाच्या समन्वयकांनी येथे दिली.

रेल्वेच्या त्या व्हायरल पत्राबाबत खुलासा..
 
समन्वयकांनी नुकतीच येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केल्यानंतर 60 दिवसांत त्याबाबत आरोपपत्र दाखल करणे गरजेचे असते. तांबडी येथील गुन्हा जुलैमध्ये झाला असून, 24 सप्टेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करणे गरजेचे आहे. अन्यथा 26 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात मराठा समाजाचा रोष व्यक्त होईल, असे मोर्चाचे समन्वयक राजन घाग यांनी सांगितले.
 
कोपर्डीच्या घटनेनंतर सारे राज्य ढवळून निघाले; मात्र अजूनही या आरोपींना शिक्षा झाली नाही. अशा स्थितीत रोहा तालुक्‍यातील तांबडी येथेही अशीच घटना घडली. 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून केला. ही बातमी दुर्लक्षित ठेवण्याची धडपड झाली. तत्काळ तपास करून एका आरोपीला अटक करणाऱ्या तपासी अधिकाऱ्याला बदलण्यात आले. या घटना संशयास्पद आहेत, असेही मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले. यासंदर्भात समन्वयकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आहे. या कुटुंबाच्या मागे मराठा मोर्चा उभा राहील, असेही स्पष्ट केले. खटला द्रुतगती न्यायालयात चालवावा; तसेच जुन्या तपास अधिकाऱ्याला परत या प्रकरणाचा तपास सोपवावा, अशा मागण्याही करण्यात आल्या. 

(संपादन- बापू सावंत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha from Raigad