वीज मंडळाच्या कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाची धडक! रखडलेली नोकरभरती पूर्ण करण्याची मागणी

कृष्ण जोशी
Wednesday, 2 December 2020

राज्य वीज मंडळात उपकेंद्र सहायक पदावर जानेवारीतच आरक्षित गटातून नियुक्त झालेल्या मराठा उमेदवारांवर केवळ कोरोनाकाळात झालेल्या विलंबामुळे आता नोकऱ्या न मिळण्याचे संकट आले आहे

मुंबई ः राज्य वीज मंडळात उपकेंद्र सहायक पदावर जानेवारीतच आरक्षित गटातून नियुक्त झालेल्या मराठा उमेदवारांवर केवळ कोरोनाकाळात झालेल्या विलंबामुळे आता नोकऱ्या न मिळण्याचे संकट आले आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घ्यावा, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वीज मंडळाच्या ठाणे, रायगड आणि वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. 

हेही वाचा - ऑनलाईन वर्ग, गॅझेट्‌सच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांच्या स्नायूंवर ताण; तज्ज्ञांची माहिती

आरक्षित गटातील या मराठा उमेदवारांची जानेवारीत निवड झाली व मार्चमध्ये नियुक्तीचा आदेश घेऊन ते एप्रिलपासून कामावर रुजू होणार होते; मात्र मार्चअखेरपासून लॉकडाऊन सुरू झाले व 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे उमेदवारांच्या नोकरीची प्रक्रियाही रखडली. लॉकडाऊनचा विलंब झाला नसता तर उमेदवारांना नोकरी मिळाली असती, हेही ध्यानात घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आज होणार होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे आता आरक्षित गटातील मराठा उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वीज मंडळाच्या ठाणे व रायगड केंद्रांवर तसेच वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. समन्वयक विरेन पवार आदींनी यापुढे या मराठा उमेदवारांसमोर येणाऱ्या अडचणींची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. 

हेही वाचा - एका चुकीच्या क्‍लिकमुळे हुकला आयआयटी प्रवेश; विद्यार्थ्याची सर्वोच्च न्यायालयात धाव!

मुळात सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश नव्या नोकरभरतीला लागू आहे. त्यामुळे तो जुन्या नोकरभरतीला लागू नसल्यासंदर्भात स्पष्टीकरण घेणे आवश्‍यक होते. अजूनही तसे स्पष्टीकरण घेऊन मराठा उमेदवारांना नोकऱ्या द्या. तोपर्यंत ही नोकरभरती थांबवा आणि स्पष्टीकरण घेऊन मराठा उमेदवारांसह पुढील नोकरभरती प्रक्रिया सुरू करा. या मागण्यांवर विचार करून सुयोग्य निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात महाधिवक्‍त्यांचा सल्लाही घेण्यात येईल, असेही आश्‍वासन शिष्टमंडळाला दिल्याचे पवार यांनी सांगितले. 

Maratha Kranti Morcha strikes power board office Demand for completion of stagnant recruitment

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha strikes power board office Demand for completion of stagnant recruitment