esakal | मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

raj Thackeray sambhaji raje

संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाप्रकरणी मनसे प्रमुखांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगितलं जातंय. दुपारी तीनच्या सुमारास संभाजीराजे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल झाले होते. विशेष म्हणजे संभाजीराजेंनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. संभाजीराजे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणप्रकरणी अभ्यासक, जाणकार आणि राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. (maratha reservation sambhaji raje meet raj thackeray)

संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. संभाजीराजे यांनी याआधी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मी राज्यभरात फिरत आहे. मराठा समाजाच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आज शरद पवारांची भेट घेतली. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, दु:खी आहे, हे त्यांना सांगितलं. मराठा आरक्षणप्रकरणी त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. राजकीय मतभेद दूर ठेवून उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांनी एकत्र यायला पाहिजे आणि यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शुक्रवारी मी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन. त्यानंतर पत्रकार परिषदेत माझी भूमिका स्पष्ट करेन.

हेही वाचा: राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांवर नाराज? नवाब मलिक म्हणतात...

मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. त्यामुळे राज्यातील मराठा समाज नाराज आहे. याप्रकरणी पुढील काळात मोठी आंदोलन होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे राज्यातील अभ्यासक, जाणकार आणि राजकीय नेत्यांच्या भेट घेत आहेत. संभाजीराजे शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील. यावेळी संभाजीराजे मराठा आरक्षणप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. गुरुवारी ते प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार असल्याचं कळतंय.