मराठी कलाकारांचा पुरग्रस्तांना आधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

दोन हजार जीवनावश्‍यक वस्तूंचे किट होणार रवाना 

मुंबई ः पुरग्रस्तांसाठी सर्व स्तरातून मदत होत आहे. या मदतीमध्ये मराठी कलावंतांनी खारीचा वाटा उचलला आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरच्या तालीम हॉलमध्ये पुरग्रस्तांसाठी जीवनावश्‍यक वस्तू जमा करण्यात येत आहे. कलाकारांनी जनसामान्यांना केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात जीवनावश्‍यक वस्तू येथे जमा झाल्या. या वस्तूंची दोन हजार किट तयार करुन ती पुरग्रस्तांना पाठवण्यात येणार आहेत.

फेसबुकद्वारे अभिनेता जितेंद्र जोशी, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री यांनी लोकांना मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर यशवंत नाट्य मंदिरमध्ये लोकांनी मदतीचा ओघ सुरू केला. सुमारे 700 किलो तांदूळ, गहू, डाळी, बिस्कीट, दुधपावडर, सॅनिटरी नॅकपिन, केससुण्या, तेल, ब्लॅकेट, साबण, डिटर्जड पावडर या वस्तूंनी यशवंत नाट्य मंदिरमधील तालीम हॉल भरुन गेला आहे. या वस्तूंचे किट बनवण्याचे काम जोमाने सुरू आहे. किट बांधण्यासाठी स्वतः कलाकार तालीम हॉलमध्ये मदत करत आहे.

उमेश जगताप, संदीप पाठक, प्रिया बापट, जितेंद्र जोशी तालीम हॉलमध्ये मदत कार्य करत आहेत. त्याच्या दिमतीला बॅकस्टेज यांचा सहभाग आहे. यशवंत नाट्य मंदिर बरोबर बोरीवलीचे प्रबोधकार ठाकरे, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये जीवनावश्‍यक वस्तू जमा केल्या जात आहे. 

मराठी नाट्य कलाकार संघातर्फे आर्थिक मदतीचा धनादेश अभिनेते प्रदीप कबरे यांनी सुबोध भावे यांच्याकडे सुपूर्द केला. पुरग्रस्तांना त्यांचे घर, संसार पुन्हा उभा करण्यासाठी जीवनावश्‍यक वस्तू त्याच्यापर्यंत पोहोचवणे आवश्‍यक आहे. या आमच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसादाबद्दल आभार मानतो, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुबोध भावेने फेसबुक लाईव्हद्वारे दिली. 

5 किलो गव्हाचे पीठ, 5 किलो तांदूळ, 2 किलो रवा, अर्धा किले तूरडाळ, 1 किलो चवळी, 1 किलो बेसनपीठ, अर्धा लीटर गोडतेल, अर्धा किलो मीठ, 100 ग्रॅम हळद, साखर 1 किलो, मसाले 100 ग्रॅम, चहापत्ती 100 ग्रॅम, दूध पावडर 200 ग्रॅम, टुथपेस्ट 1 नग, मेणबत्ती 2 नग, ब्लॅकेट 2 नग, चटई 2 नग, कपड्यांची पावडर अर्धा किलो,साबण 1 नग, माचिस बॉक्‍स 2 नग असे सर्व वस्तूंचे 2000 किट तयार करण्यात येत असून प्रत्येक कुटूंबाला एक किट देण्यात येईल. 16 ऑगस्ट रोजी ही सर्व किट तीन्ही ठिकाणांहून एकत्रित करुन कोल्हापूरला पाठवण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Artists Support Flood Victims