चकित करणारं रहस्यनाट्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘३८ कृष्ण व्हिला’

चकित करणारं रहस्यनाट्य

चकित करणारं रहस्यनाट्य

कथा, कविता, कादंबरी, नाटक हे वेगवगळे वाङ्‍मयीन कलाप्रकार हाताळणाऱ्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या लिहिण्यावर अधूनमधून तोंडी लावायला म्हणून काही कलाकृती जन्माला येतात; पण अख्खं नाटकच वाङ्‍मयीन व्यवहारावर गुंफून डॉ. श्‍वेता पेंडसे यांनी लिहिलेलं ‘३८ कृष्ण व्हिला’ चकित करणारं आहे.

साहित्य क्षेत्रात विविध घडामोडी घडत असतात. त्याची चर्चा वाङ्‍मयीन व्यवहाराशी संबंधित वर्तुळात होत असते. त्यावर क्वचितच कलाकृती आकाराला येते. ‘३८ कृष्ण व्हिला’ची गोष्ट मात्र साहित्यकलाकृतींचे संदर्भ, त्यातील दाखले, कॉपीराईट ॲक्ट आणि या नाटकातील तीन महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची वाङ्‍मयीन जडण-घडण, त्यांच्या जाणिवा आणि टोकदार संघर्षाने विणली आहे. हे वरवर साधंसरळ वाटत असलं, तरी कथा मात्र वेगवेगळी वळणं घेत, धक्के देत आश्‍चर्यचकित करते.

प्रसिद्ध लेखक देवदत्त कामत (डॉ. गिरीश ओक) यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ‘अक्षररत्न’ पुरस्कार जाहीर झालेला असतो. हा पुरस्कार त्यांनी स्वीकारू नये, असा विचित्र आग्रह नंदिनी चित्रे (डॉ. श्‍वेता पेंडसे) या महिलेचा आहे. त्यासाठी ती कामतांना निनावी फोन करून वारंवार सांगते. कामत ऐकायला तयार नसतात, म्हणून नंदिनी कोर्टाची नोटीस धाडते. प्रकरण कोर्टात जाण्यापूर्वी नंदिनीची समजूत घालावी म्हणून कामत नंदिनीला ‘३८ कृष्ण व्हिला’ या त्यांच्या निवासस्थानी बोलावून घेतात. नंदिनी प्रवेश करते आणि नाटक सुरू होते. कामत तिला समजावण्याचा प्रयत्न करतात; पण ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. पुरस्कार स्वीकारायचा नाही, यावर नंदिनीला निर्णय हवा असतो. कामत तिला शांत करण्याचा, तिच्या विचित्र आग्रहाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यावर ती तुम्ही खोटारडे आहात. ‘यक्ष’ या टोपण नावानं लिहिलेल्या ‘भग्न’ या कादंबरीला भारत सरकारचा सर्वोच्च ‘अक्षररत्न’ पुरस्कार जाहीर झाला, पण ही कादंबरी तुम्ही लिहिलीच नाही, असा आरोप करते. ‘भग्न’ या कादंबरीसह ‘बिंदूवलय’, ‘व्यूहचक्र’, ‘समाधी’, ‘वरचढ’, ‘मध्यस्थिती’ या साहित्य कलाकृतीही तुम्ही लिहिल्या नाहीत, असा गौप्यस्फोट करते.

कामत यांनी या कलाकृती लिहिल्याच नाहीत, या नंदिनीच्या आरोपात अनेक तथ्यांश दडले आहेत. या कथा-कादंबऱ्यांमध्ये जे प्रसंग, पात्र कामतांनी उभी केली आहेत, ते नंदिनीच्या आयुष्याशी नातं सांगणारी आहेत. ते फक्त तिचा नवरा मोहन चित्रे आणि तिलाच ठावूक आहेत. ते जसंच्या तसं कामतांनी कादंबरीत मांडलं. मोहनला लिखाणाची पार्श्वभूमी आहे; पण तो आता लिहीत नाही, ही सल नंदिनीला बोचणारी आहे; पण हे त्याचं लिखाण असेल, तर त्यानेच का तक्रार केली नाही? नंदिनीच पुढाकार का घेते? अशा अनेक प्रश्‍नांत गुंतवून एकेका रहस्याची उकल करत, हे नाटक शेवटी एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाते.

दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या नाटकाची बांधणी सर्वांगसुंदर केली आहे. मध्यंतराच्या कर्टनलाईनला एक मोठा धक्का देऊन तिथूनच दुसरा अंक सुरू होतो. मध्यंतरापूर्वी आणि मध्यंतरानंतर कुठलाही ‘लाईट ब्रेक’ न घेता नाटक सलग रंगतं. प्रत्यक्ष रंगमंचावर दोनच पात्र. नाटक प्रतिभावंत साहित्यकाराच्या कलाकृतीवर असल्याने शब्दसामर्थ्याचा, लेखकांच्या अंतर्मनातील भावभावनांचा, त्यांच्या कलात्मक जाणिवांचा अलौकिक श्रीमंतपणा डॉ. गिरीश ओक यांनी तेवढ्याच ताकदीने रंगमंचावर आविष्कृत केला आहे. सिद्धहस्त लेखक कामतांची भूमिका ते प्रत्येक श्‍वासासह जगले आहेत. नाटकाची लेखिका डॉ. श्‍वेता पेंडसे यांनी जन्माला घातलेली नंदिनीची भूमिका स्वत:च साकारली आहे. या व्यक्तिरेखेतील आक्रमकपणा, करारीपणा, अंतर्मनातील गोंधळ, मोहनशी असलेल्या भावनिक नात्याचे पदर छान उकलले आहेत.

‘३८ कृष्ण व्हिला’च्या निमित्ताने कॉपीराईट ॲक्टचीही चर्चा आहे. ती नाटकाच्या कथासूत्राशी नातं सांगणारी आहे. कॉपीराईटसाठी कुठले पुरावे ग्राह्य धरले जातात, हा मुद्दा नाटकाच्या संघर्षाला कलाटणी देण्यासाठी महत्त्वाचा ठरला. असे अनेक मुद्दे या नाटकाच्या कथासूत्रात आले आणि त्यातून लेखिका म्हणून डॉ. श्‍वेता पेंडसे यांनी आशयविषयाची बाजू भक्कम केली.

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी शीर्षकस्थानी असलेला ‘३८ कृष्ण व्हिला’ हा सिद्धहस्त लेखकाचा बंगला कथासूत्रानुसार उभा केला. त्यात बुकसेल्फपासून नाटकाची गोष्ट फुलवणाऱ्या साधनसंपत्तीचा नेटका विचार दिसतो. अजित परब यांच्या पार्श्वसंगीताने नाट्यगोष्टीचा स्वर अधोरेखित झाला आहे. वेशभूषा मंगल केंकरे आणि प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. मिहीर गवळी यांची निर्मिती असलेल्या या कलाकृतीचे उत्कर्ष मेहता, ऋतुजा शिदम हे सहनिर्माते आहेत. एक वेगळ्या धाटणीचा प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याच्या त्यांच्या धाडसाचं कौतुक करायलाच हवं. ‘३८ कृष्ण व्हिला’ची नोंद साहित्यकलेवर भाष्य करणारं महत्त्वाचं नाटक म्हणून भविष्यात होईल, एवढी ताकद या नाटकात आहे.

बहुतांश कलाकृती सादर होताना ‘या कलाकृतीतील पात्र, घटना, व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत. त्या कुणाच्या वास्तव जीवनाशी साधर्म्य साधणाऱ्या वाटत असल्यास तो केवळ योगायोग समजावा,’ असं नमूद करण्यात येतं. ‘३८ कृष्ण व्हिला’चं बांधकाम डॉ. श्‍वेता पेंडसे यांनी याच सूत्रावर आधारित केलं आहे. त्यामुळे या नाटकाची गोष्टही काल्पनिक आहे की कुणाच्या वास्तव जीवनाशी नातं सांगणारी, हा प्रश्‍न साहित्य वर्तुळात चर्चेचा ठरू शकेल.

mahendra.suke@esakal.com

Web Title: Marathi Natak Review 38 Krishna Villa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top