व्यावसायिक नाटकांना अनुदान नको - केंकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

मुंबई - 'व्यावसायिक नाटके 40 वर्षांपासून रंगमंचावर सादर होत आहेत. आता त्यांनी काहीसे स्थिरस्थावर व्हायलाच हवे. त्यांना अनुदानाने पांगळे न करता आता नाट्याची भावी पिढी ज्या रंगभूमीपासून तयार होणार आहे, त्या बालरंगभूमी व प्रायोगिक रंगभूमीला अनुदान लागू करावे. व्यावसायिक नाटकांना अनुदान द्यायची गरज नाही,'' असे परखड मत ज्येष्ठ दिग्दर्शक रंगकर्मी विजय केंकरे यांनी व्यक्त केले.

यशवंत नाट्य मंदिर येथे आज बालरंगभूमी अभियानाचे उद्‌घाटन विजय केंकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे सडेतोड मत मांडले. केंकरे म्हणाले, 'बालरंगभूमीवर यापूर्वी सुधा करमरकर यांच्यापासून रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर यांच्यापर्यंत सगळ्यांनी नाटके लिहून बसवली; ती नाटके पाहून आम्ही मोठे झालो. मात्र, आज बालरंगभूमी अत्यंत वाईट परिस्थितीत असून त्याला आपण सारेच जबाबदार आहोत. ही परिस्थिती बदलायची असेल, तर त्याकडे अत्यंत गांभीर्याने बघावे लागेल.'' बालरंगभूमी व प्रायोगिक रंगभूमीला सशक्त करण्यासाठी त्यांना अनुदान द्या. ही भूमिका निर्मात्यांच्या जरी विरुद्ध असली तरीही ती वास्तववादी असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी या वेळी दिले.

Web Title: marathi news mumbai news drama subsidy vijay kenkare