कोस्टल रोड, सी लिंक कालबाह्य?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

मुंबई : मेट्रो प्रकल्पामुळे कोस्टल रोड आणि सी लिंकसारखे अवाढव्य खर्चाचे प्रकल्प कालबाह्य ठरण्याची दाट शक्‍यता असून, यावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे.

मेट्रोचा वापर येत्या 20 वर्षांत 100 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे अपेक्षित असताना सरकारी यंत्रणा खासगी वाहनांसाठी मोठ्या बजेटच्या प्रकल्पांसाठी आग्रही असल्याने भविष्यातील गरजा लक्षात न घेता केलेला खर्च वाया जाण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

मुंबई : मेट्रो प्रकल्पामुळे कोस्टल रोड आणि सी लिंकसारखे अवाढव्य खर्चाचे प्रकल्प कालबाह्य ठरण्याची दाट शक्‍यता असून, यावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे.

मेट्रोचा वापर येत्या 20 वर्षांत 100 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे अपेक्षित असताना सरकारी यंत्रणा खासगी वाहनांसाठी मोठ्या बजेटच्या प्रकल्पांसाठी आग्रही असल्याने भविष्यातील गरजा लक्षात न घेता केलेला खर्च वाया जाण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

पालिकेने मुंबईतील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मोबिलिटी प्लान तयार केला आहे. या आराखड्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहर वाहतूक धोरणानुसार (एनयूटीपी) सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याबरोबरच खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची शिफारस केली आहे. तसेच रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी महापालिकाही वाहनतळाच्या शुल्कात अनेक पटीने वाढ करत आहे; मात्र तरीही खासगी वाहनांसाठी कोस्टल रोडसारखा महागडा प्रकल्प बांधण्यात येत आहे. त्याचा वापर फक्त खासगी वाहनांसाठी होणार आहे. 

या दुटप्पी धोरणामुळे निधीचा अपव्यय होणार असल्याची शक्‍यता आहे. दोन मेट्रो रेल्वेचे प्रकल्प असताना या प्रकल्पांची आवश्‍यकता नाही, असे मत तज्ज्ञ नोंदवत आहेत. महापालिकेच्या मोबिलिटी प्लाननुसार मेट्रोचा वापर 2034 पर्यंत शंभर पटीने वाढणार आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी सार्वजनिक वाहतुकीवरच भर देणे योग्य ठरणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

वाहतूक साधनांचा वापर (सकाळी 6 ते 11) 
प्रकार - सध्या - 2034 

  • मेट्रो मोनो - एक लाख तीन हजार प्रवासी (2.4 टक्के) - 17 लाख 53 हजार (26.5) 
  • कार - तीन लाख 61 हजार (8.5 टक्के) - सहा लाख तीन हजार (9.1) 
  • दुचाकी - चार लाख 59 हजार (10.8) - चार लाख 73 हजार (7.2) 

टोलमुळे प्रकल्प अपयशी? 
कोस्टल रोड आणि सागरी सेतूला टोल लागणार आहे. त्यामुळे मुंबईतल्या मुंबईत टोल भरून किती वाहने या दोन्ही मार्गांचा वापर करतील, हा प्रश्‍नच आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतू बांधण्यापूर्वी दिवसाला एक लाख 20 हजार वाहने वापर करतील असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात 37 हजार 336 हजार वाहने त्याचा वापर करतात. वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांवर टोल लागण्याची शक्‍यता आहे. 

कोस्टल रोड आणि सागरी सेतू या दोन्ही प्रकल्पांची गरज नाही. या प्रकल्पांची आखणी झाली होती तेव्हा मेट्रोची फक्त चर्चा होती. आता उपनगरात मेट्रो रेल्वेचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे आता दोन्ही प्रकल्पांचा फेरविचार करायला हवा. 
- द. मा. सुखटणकर, माजी महापालिका आयुक्त 

मुंबईला कोस्टल रोड लिंक रोडची गरज नाही. येत्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढणाऱ्या समुद्राच्या पातळीचा विचार करून कोस्टल प्रोटेक्‍शन प्रकल्प राबविण्याची गरज आहे. शहरातील वाहतूक समस्या सोडवायची असेल तर बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट सिस्टीम हाच सर्वोत्तम आणि स्वस्त पर्याय आहे. 
- सुधीर बदामी, वाहतूक तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai news vandre worli sea link mumbai metro mumbai coastal road