मीरा भाईंदरभाजप मध्ये मराठी अमराठी वाद रंगणार! भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांची हकालपट्टी होणार?

संदीप पंडित
Sunday, 7 February 2021

आगामी मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने आता जिल्हाध्यक्षपदी गुजराथी समाजातील नेत्याची नियुक्ती करण्याची योजना आखली असल्याचे सांगण्यात येत आहे

भाईंदर  : मिरा-भाईंदर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकविल्यामुळेच त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरून येत्या आठवड्याभरात हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे अधिकृत वृत्त आहे. आगामी मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने आता जिल्हाध्यक्षपदी गुजराथी समाजातील नेत्याची नियुक्ती करण्याची योजना आखली असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे याठिकाणी मराठी अमराठी असा वाद रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असल्याने हेमंत म्हात्रे यांची दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झालेली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. या सत्तेचा रिमोट कंट्रोल आजही भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याच हाती आहे. मागील विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर नरेंद्र मेहता यांनी भाजपाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. मात्र मेहता यांच्याच आदेशानुसार महानगरपालिकेत भाजपाचा कारभार आजही हाकला जात आहे. 

मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर आपले वर्चस्व गाजविण्याकरीता जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी भाजपातील असंतुष्ट नगरसेवकांना हाताशी धरून मेहतांविरूद्ध बंडाचे निशाण फडकविले आहे. यामुळे भाजपामध्ये उभी फुट पडल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. मात्र आजवर मौन धारण करून असलेल्या नरेंद्र मेहता यांनी आपले अस्त्र उपसले असून त्यांनी आता जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांचीच या पदावरून उचलबांगडी करण्यासाठीचा विडा उचलला आहे. ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई, वसई-विरार आणि कल्याण डोंबिवली या महापालिका निवडणूकांचा कार्यक्रम लवकरच जाहिर होणार आहे. त्यामुळे आता पक्षांतर्गत हालचालींनाही वेग आला आहे. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

या निवडणूकांकरीता आर्थिक रसद पुरविण्याची कामगिरी भाजपाने नरेंद्र मेहता यांच्यावर सोपविलेले असल्याचे कळते. मेहता यांनी मात्र पक्षादेश मान्य करतानाच जिल्हाध्यक्ष पदावरून हेमंत म्हात्रे यांची हाकालपट्टी करण्याचा प्रस्ताव भाजपाच्या राज्य कार्यकारीणीकडे सोपविला आहे. मेहता यांच्या प्रस्तावावर गांभिर्यपुर्वक विचार सुरू असल्याने हेमंत म्हात्रे यांची येत्या आठवडाभरात जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली जाणार असल्याचे मानण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मेहता यांची राज्यस्तरीय कार्यकारीणीत देखील निवड केली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप हा शेटजींचा पक्ष असल्याचे हेमंत म्हात्रे यांच्या हकालपट्टीने पुढे येणार असल्याचे दिसत आहे. 

मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सार्वत्रिक 2022 च्या ऑक्‍टोबर महिन्यात होत असून या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने या शहरात भाजपाचा गुजराथी चेहरा समोर आणण्याची योजना आखली आहे. शिवसेना सहयोगी अपक्ष आमदार गिता जैन यांना काटशह देण्याकरीताच भाजपाने हा नवा डाव रचला असल्याचे मानले जात आहे. 

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Marathi non mrathi clashesh Mira Bhayander bjp political latest updates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi non mrathi clashesh Mira Bhayander bjp political latest updates narendra mehata hemant mhatre