esakal | गणेशाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशाच्या आगमनासाठी शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी फुलल्या आहेत

गणेशाचे आगमन दहा दिवसांवर येऊन ठेपले असून, शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी फुलल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या डेकोरेशनचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.

गणेशाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : गणेशाचे आगमन दहा दिवसांवर येऊन ठेपले असून, शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी फुलल्या आहेत. शहरवासीय गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाले असून, आपला गणपती सर्वात वेगळा दिसावा, यासाठी लोकांची रघुलीला, इनऑर्बिट मॉल, एपीएमीसी मार्केट आदी ठिकाणी गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. विठू माऊली मालिकेत पांडुरंगाने वापरलेल्या दागिन्यांची डिझाईन, मुकुट याची मागणी बाजारपेठेत अधिक दिसून येत आहे. 

गणेशोत्सवात फुलांचे भाव वाढत असल्याने मखरांना, फुलांच्या माळा घेण्यास ग्राहक सरसावत आहेत; तर विद्युत रोषणाईच्या झगमगाटासाठी विजेच्या चायना माळांना जास्त मागणी दिसून येतेय. बल्ब्सच्या, पारलाईट, लोप लाइट, ड्रॉप लाईट, स्ट्रिप लाईट आदी प्रकारच्या माळा घरगुती डेकोरेशनसाठी उपलब्ध आहेत. यंदा जय मल्हार, पांडुरंगाच्या अवतारातील, लालबागचा राजा, शिवाजी महाराज, दगडू शेठ, श्री कृष्ण गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच शाडूपासून बनवलेल्या मूर्ती, तसेच कागदापासून तयार केलेल्या बाप्पाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत इकोफ्रेंडली मूर्तींची मागणी १० टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर होणारे पाण्याचे प्रदूषण, पर्यावरणाची हानी याबाबत अनेक सामजिक संस्था, शाळा, महविद्यालयांतील विद्यार्थी, तसेच मूर्तिकार जनजागृती करत आहेत. शहरात होणाऱ्या जनजागृतीच्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी इकोफ्रेंडली मूर्तीचा वापर करावा, असे आवाहन भाविकांना करण्यात येत आहे. 

इकोफ्रेंडली मखर
कागदाच्या लगद्याने आणि जाड पुठ्ठ्यांनी तयार केलेले मखर बाजारात दाखल झाले असून, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी या मखरांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. थर्माकोलच्या मखरांना पर्याय म्हणून हे मखर बाजारात आले आहेत. पुठ्ठ्यांच्या या मखरांमध्ये विविध प्रकार आहेत. या मखरांच्या किमती १५०० पासून ६५०० रुपयांपर्यंत आहेत.

ढोल-ताशा पथके सज्ज
नियमांचे पालन करून शहरातील ढोल-ताशा पथकांनी सराव केला आहे. पोलिसांनी डीजेवर बंदी घातल्याने ढोल पथकांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये ढोल पथकांचा आवाज घुमणार असून, त्यासाठी पथके सज्ज झाली आहेत.

loading image
go to top