माथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ

matheran
matheran

नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. 

दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस प्रशासन देखील देत नसल्याने सर्वांच्या मदतीने हा प्रकार सुरू असल्याचा संशय निर्माण होत आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील केले. त्याआधी माथेरान मध्ये ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी आहे. रुग्णवाहिका वगळता माथेरान मध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना येथील लाल मातीच्या रस्त्यावर प्रवेश नाही. त्यामुळे वाहन बंदी आदेशाचे पालन सर्व शासकीय यंत्रणा यांच्याकडून होत असते.मात्र मागील काही वर्षात माथेरानमध्ये वाहने घुसवली जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात एका नगरसेवकाने पेव्हर ब्लॉकने भरलेला ट्रक मध्यरात्री घुसवला आणि त्यावर अश्वपाल संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर काही दिवस माथेरान मधील वातावरण गरम झाले होते. हे सुरू असताना माथेरान नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने नियोजन करून रुग्णवाहिकेचा अनधिकृत वापर होणार नाही आणि कोणतीही वाहने निर्बंध असलेल्या भागात प्रवेश करणार नाहीत याची काळजी घेण्यास सुरुवात केली. मात्र प्रशासन अशा प्रकारास सहकार्य करीत असल्याचे निदर्शनास येत असून अश्वपाल संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर दस्तुरी नाका येथे माथेरान गावात रुग्णवाहिका येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर असलेले लोखंडी गेट कुलूप बंद केले. पालिकेने त्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती.

मात्र 13 मार्चच्या रात्री पुन्हा पावणे तीनच्या सुमारास रस्त्याचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य घेऊन निघालेला ट्रक दस्तुरी नाका येथील लोखंडी गेटचे कुलूप उघडून आतमध्ये शिरले.याबाबत 18 मार्च पर्यन्त माथेरान मध्ये कोणालाही कोणतीही माहिती नव्हती. मात्र एका आरटीआय कार्यकर्त्याने दस्तुरी नाका येथे लोखंडी गेटवर लक्ष ठेवण्यासाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता 13 मार्च रोजी दोन ट्रक शहरात गेले असल्याचे उघड झाले.त्या कार्यकर्त्यांने त्याबाबत माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांना फुटूजचे व्हिडीओ पाठवून माथेरान पोलीस कायद्याची अंमलबजावणी करीत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी अलिबाग मध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची क्राईम मिटिंग सुरू होती. ब्रिटिश काळापासून आलेले नियम डावलून होत असलेली वाहनांची घुसखोरी याबद्दल आदेश दिल्यानंतर माथेरान पोलिसांनी घटना घडल्यानंतर तब्बल सहाव्या दिवशी म्हणजे 19 मार्च रोजी गुन्हा नोंद करण्यात सुरुवात केली. माथेरान पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 13 मार्च रोजी पर्यावरण नियम डावलून आणि वाहन बंदीचा आदेश डावलून शहरात माल वाहतूक करण्यासाठी गेलेल्या दोन ट्रकवर गुन्हा नोंद केला.त्यात मागील प्रकरणाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे कठोर कारवाईचे विषय यावेळी देखील माथेरान पोलिसांकडून केले गेले नाही.त्यात माथेरान पोलीस ठाणे त्या गुन्ह्याबद्दल अधिक माहिती देखील माध्यमांना देत नसल्याने वाहनांना प्रवेश बंदी आदेश मोडण्यास पोलीस प्रशासन सहकार्य करीत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. शहरात घुसलेल्या दोन ट्रक बद्दल पालिका मुख्याधिकारी आणि प्रभारी पोलीस अधिकारी यांच्या कडून नो कॉमेंट्स अशी प्रतिक्रिया येत आहेत. मात्र असे प्रकार हे प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाहीत. त्यात मुंबई मधील पर्यावरण प्रेमी यांच्याकडून दाखल केलेले सर्वोच्च न्यायालयातील रिट आणि त्यावर राष्ट्रीय हरित लवादाकडून सुरू असलेली कारवाई याची भीती देखील नियमांचे उल्लंघन करताना संबंधित यांना आणि त्यावर पायबंद न घालणाऱ्या प्रशासनाला दिसून येत नाही.

प्रेरणा सावंत-नगराध्यक्ष माथेरान गिरीस्थान नगरपरिषद
माथेरान नगरपालिका कोणत्याही चुकीच्या गोष्टीना पाठिंबा देत नाही. पालिकेने असे प्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, लोखंडी गेट बंद केले आहे. तरी देखील असे प्रकार होत असतील तर गंभीर आहे. मात्र या निमित्ताने शहरातील सामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या घरगुती साहित्याची ने आण करण्यासाठी मालवाहू मिनीगाडी सुरू करावी हा मुद्दा पुन्हा समोर येत असून वाढते पर्यटन यासाठी सामानाचीने आण करण्यासाठी मालवाहू गाडी रेल्वेने सुरू करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com