धुवाधार पावसामुळे माथेरानची वाताहत 

अजय कदम
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

माथेरानमधील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी खूप मोठ्या निधीची आवश्‍यकता आहे. "क' वर्गाची नगरपालिका असल्यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न कमी असल्याने निधी उभा करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. 

माथेरान : पावसाने गेले तीन महिने माथेरानला अक्षरश: झोडपले आहे. या विक्रमी सरींनी लाखो पर्यटकांच्या आवडीच्या निसर्गरम्य स्थळाचे अनेक रस्ते वाहून गेले आहेत. जमिनीची तर बेसुमार धूप झाल्याने या गावाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. 

माथेरानमध्ये मोटार वाहनांना बंदी आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातील लाखो पर्यटक येथे दरवर्षी येतात. या वर्षी तर पावसाळ्यात गर्दीने विक्रम केला होता. परंतु आता मुसळधार पावसाने या स्थळाचे मोठे नुकसान झाले आहे. 

मिनी ट्रेनला खीळ 
27 जुलैला पडलेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ-माथेरान घाटात मिनी ट्रेनच्या रुळावर पडलेल्या दरडी तापदायक ठरल्या. त्यातच काही ठिकाणी रुळाखालील जमीन वाहून गेल्याने मिनी ट्रेन एका वर्षासाठी बंद ठेवण्यात आली आहे. अमन लॉज-माथेरान या शटल सेवेवरही सुरक्षेच्या कारणामुळे गंडांतर आले आहे. 

जमिनीची बेसुमार धूप 
गेल्या काही वर्षांत माथेरानमध्ये सातत्याने धूप झाली आहे. त्याचा परिणाम वृक्षराजीवर झाला असून अनेक वृक्ष कोलमडून पडले आहेत. त्यानंतर धूप रोखण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नसल्याने मोठी हानी झाली आहे. या वर्षीच्या पावसात तर अनेक झाडे उन्मळून पडली. नजीकच्या काळात धूप रोखता आली नाही, तर या गावाचे अस्तित्वच धोक्‍यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. 

पालिकेसमोर मोठे आव्हान 
गावातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी खूप मोठ्या निधीची आवश्‍यकता आहे. "क' वर्गाची नगरपालिका असल्यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न कमी असल्याने निधी उभा करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. 

पर्यटकसंख्या रोडावली 
मुसळधार पावसानंतर मिनी ट्रेन बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना हॉटेल, बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. त्यामुळे पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली. या वर्षी मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन आणि एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे जून ते 15 सप्टेंबर या चार महिन्यात फक्त 1 लाख 70 हजार पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते. 

पावसात सण साजरे 
श्रावण महिना संपल्यावर पावसाचे प्रमाण कमी होते; पण या वर्षी त्याने थोडीही विश्रांती घेतली नाही. त्यामुळे सर्व सण हे पावसातच साजरे करावे लागले. मिनी ट्रेन बंद असल्यामुळे गणेशमूर्ती भर पावसात डोक्‍यावर आणाव्या लागल्या. अनेकांना 5 किलोमीटर पायपीट करावी लागली. 

मुसळधार पावसामुळे माथेरानमधील नागरिक हैराण झाले आहेत. यापूर्वी असा पाऊस कधीही बरसला नव्हता. रस्त्याची चाळण झाली आहे. ते दुरुस्त करण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- प्रसाद सावंत, बांधकाम सभापती, माथेरान 

माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. येथील पर्यावरण स्थानिकांनी जपल्यामुळे या गावात चांगला पाऊस पडतो. या वर्षी तर पावसाने विक्रम केला आहे. पण येथील जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. ही गंभीर बाब सरकारने लक्षात घ्यावी. 
- सुनील शिंदे, पर्यावरणप्रेमी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matheran survives due to heavy rains